इंद्रावती नदीवर संरक्षण कॅम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:03 IST2018-06-04T23:02:52+5:302018-06-04T23:03:02+5:30
सागवान व वन्यजीव तस्करी थांबवण्यासाठी महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याची दुभाजक असलेल्या इंद्रावती नदीवर छत्तीसगड सरकारच्या वतीने छत्तीसगडच्या हद्दित संरक्षण कॅम्प व तिमेड येथे आंतरराज्यीय तपासणी नाका लावण्याचा निर्णय आंतरराज्यीय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे वनतस्करीला आळा बसणार आहे.

इंद्रावती नदीवर संरक्षण कॅम्प
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सागवान व वन्यजीव तस्करी थांबवण्यासाठी महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याची दुभाजक असलेल्या इंद्रावती नदीवर छत्तीसगड सरकारच्या वतीने छत्तीसगडच्या हद्दित संरक्षण कॅम्प व तिमेड येथे आंतरराज्यीय तपासणी नाका लावण्याचा निर्णय आंतरराज्यीय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे वनतस्करीला आळा बसणार आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये अत्यंत मौल्यवान सागवान आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दित असलेल्या सागवानाची तेलंगणा व छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होते. वन तस्कर इंद्रावती नदीचा फायदा उचलतात. महाराष्ट्र शासनाने वनतस्करी थांबविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दित संरक्षक कॅम्प बसविले आहे. मात्र छत्तीसगड राज्यात अशा प्रकारचे कॅम्प नसल्याने छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात वनतस्कर गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दित प्रवेश करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी इंद्रावती नदीच्या परिसरात छत्तीसगड राज्याच्या हद्दित छत्तीसगड शासनाच्या वतीने संरक्षण कॅम्प बसविण्याचा निर्णय आंतरराज्यीय बैठकीत घेण्यात आला. सदर बैठक २ व ३ जून रोजी छत्तीसगडमधील भोपालपट्टनम येथे पार पडली. या बैठकीला बिजापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तंबोली, डीएफओ एन. गुरूनाथन, जयशंकर भूपालपल्ली, सिरोंचाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, भामरागडचे उपवनसंरक्षक एन. सी. एस. बाला उपस्थित होते. या बैठकीत वन कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले.