बैठक : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशगडचिरोली : जिल्ह्यात खरीप हंगामात १४ हजार ८९४ हेक्टर क्षेत्र पेरणीखाली असते. त्यापैकी १३ हजार २९९ हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. यातून सर्वसाधारणपणे २४ लाख क्विंटल धान उत्पन्न होते. महामंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे होणारी खरेदी पाच लाख क्विंटलच्या आसपास आहे. साधारण इतकेच धान शेतकरी वर्षभराच्या वापरासाठी ठेवतात. अशा स्थितीत धानखरेदी वाढविली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले आहे. खरीप हंगामाच्या नियोजनासोबत धान खरेदी केंदाचे नियोजन करून वेळेपूर्वी खरेदी आराखडा तयार करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक २४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, पणन अधिकारी व्ही. डी. डबीर, कृषी विभागाचे चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते. १६८८ गावांपैकी ३८८ गावात पणन मंडळातर्फे खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गेल्या वर्षी २३० गावांपेक्षा अधिक क्षेत्रासाठी खरेदी केंद्र नव्हते. त्यात वाढ होणार आहे. सप्टेंबर महिन्यात खरेदी केंद्राची यादी जाहीर होईल.
जिल्ह्यात धान खरेदी वाढवा
By admin | Updated: June 25, 2016 01:19 IST