कमलापुरातील तलावाचे खोलीकरण व कॅनल दुरूस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 00:22 IST2017-05-19T00:22:26+5:302017-05-19T00:22:26+5:30
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

कमलापुरातील तलावाचे खोलीकरण व कॅनल दुरूस्ती करा
ग्रामस्थांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या भागात शेतीशिवाय उपजिविकेचे दुसरे साधन नाही. परंतु मागील २६ वर्षांपासून तलावाचे खोलीकरण न झाल्याने तलाव उथट झालेला आहे. त्यामुळे सदर तलावाचे खोलीकरण व कॅनल दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चंद्रपूर पाटबंधारे विभागाअंतर्गत सदर तलाव येत असून २७ हेक्टर क्षेत्रात तलावाचा विस्तार आहे. या तलावाच्या सिंचनाखाली ३०० ते ४०० हेक्टर शेती आहे. पूर्वी शेतीला पाणी पुरेल एवढा जलसाठा राहत होता. परंतु २६ वर्षापासून तलावाचे खोलीकरण न झाल्याने तलावात गाळ व माती जमा झाली आहे. शिवाय कॅनल जागोजागी लिकेज असून शेतकऱ्यांच्या शेतीला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. दरवर्षी दुष्काळाच्या परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन तलावाचे खोलीकरण व कॅनल दुरूस्ती करावी, अशी मागणी सरपंच रजनीता मडावी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावने यांनी स्वीकारले. निवेदन देताना ग्रा. पं. पदाधिकारी उपस्थित होते.