खरेदी केलेल्या धानाची लवकर भरडाई करा- बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:19 IST2018-05-24T00:19:34+5:302018-05-24T00:19:34+5:30
जिल्ह्यात एक लाख क्विंटल धान अजुनही खरेदी केंद्रांवर पडून आहेत. धान पावसात भिजून खराब होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तत्काळ ज्या निश्चित केलेल्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडून धानाची उचल करुन भरडाई करावी, .....

खरेदी केलेल्या धानाची लवकर भरडाई करा- बापट
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात एक लाख क्विंटल धान अजुनही खरेदी केंद्रांवर पडून आहेत. धान पावसात भिजून खराब होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तत्काळ ज्या निश्चित केलेल्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडून धानाची उचल करुन भरडाई करावी, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी वडसा येथे अधिकाऱ्यांना दिले.
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्थेच्या वतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. निश्चित केलेल्या एजन्सीकडून धानाची उचल व भरडाई केली जाते. जिल्ह्यातील अन्न धान्य वितरण व्यवस्थेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट वडसा येथे आले होते. दरम्यान त्यांनी वडसा येथील धान भरडाई केंद्रास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आयुक्त रमेश आडे, सचिव सुपे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर, भरडाई मिल मालक श्रीचंद आकाश अग्रवाल, किसन नागदेवे उपस्थित होते.
पुढे बोलतांना बापट म्हणाले की, भरडाई केलेले तांदुळ गोडावूनमध्ये व्यवस्थीत ठेवण्यात यावे व मागणीनुसार पुरवठादारांना लवकरात लवकर वितरीत करावे जेणेकरून गोडावूनच्या बाहेर ताडपत्री टाकून धान्य ठेवण्याची परिस्थिती उद्भवणार नाही. त्याच बरोबर शेजारील जिल्हा चंद्रपूर येथे त्यांच्या मागणीनुसार पुरवठा दारांना आमंत्रित करुन तांदूळ हस्तांतरीत करावे, अशाही सुचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी महामंडळाचे कर्मचारी हजर होते.