गडचिरोलीमध्ये अवैध गौण खनिज उत्खननावर आता असणार भरारी पथकाची नजर
By संजय तिपाले | Updated: June 16, 2024 15:45 IST2024-06-16T15:44:16+5:302024-06-16T15:45:49+5:30
१७ जूनपासून हे पथक रेती, मुरूम तस्करीवर 'वॉच' ठेवणार आहे.

गडचिरोलीमध्ये अवैध गौण खनिज उत्खननावर आता असणार भरारी पथकाची नजर
संजय तिपाले, गडचिरोली: जिल्ह्यातील नदीपात्रातून व इतर ठिकाणाहून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरीता व महसूलाचे नुकसान टाळण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हास्तरीय भरारी पथक गठित केले आहे. १७ जूनपासून हे पथक रेती, मुरूम तस्करीवर वॉच ठेवणार आहे.
भरारी पथकात तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी आणि महसूल सहाय्यक यांचा समावेश आहे. या भरारी पथकाला अवैध गौण खनिज उत्खनन बाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करणे, संबंधीत ठिकाणी भेट देवून मौका पंचनामा, जप्तीनामा करणे, उपस्थितांचे जवाब घेणे व उत्खनन झालेल्या ठिकाणाची संबंधीत तालुक्याचे तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या उपस्थितीमध्ये मोजणी करुन पंचनामे तयार करणे, कारवाईच्या वेळेस आवश्यकता वाटल्यास पोलीस संरक्षण घेणे, केलेल्या कार्यावाहीच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल अभिप्रायासह व अभिलेख जिल्हाधिकारी यांना तातडीने सादर करणे, प्राप्त तक्रारी व त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विहित नोंदवहीत नोंदी ठेवणे आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून संपूर्ण कार्यवाही दरम्यान गोपनियता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
----
रेल्वेसाठी उत्खनन करणाऱ्या कंपनीला अभय?
दरम्यान, वडसा - गडचिरोली या ५२ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या कामासाठी कंत्राटदार कंपनीने मोठ्या प्रमाणात बेकायदेशररीत्या मुरूम उत्खनन केले आहे. एकीकडे बैलबंडीतून मुरूम, वाळू नेणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना कारवाईचा दंडुका दाखविण्यात मर्दुमकी दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून गडचिरोली शहराजवळ मुरुमाची लूट सुरू असताना प्रशासन डोळे मिटून का बसले?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कंपनीचे प्रशासनात पाठीराखे कोण, याची सध्या चर्चा आहे.