घराच्या छतातून पत्नीला शॉक देण्याचा पतीचा प्रयत्न! प्रयत्न फसल्यानंतर फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 11:28 IST2025-02-08T11:27:55+5:302025-02-08T11:28:40+5:30
चामोर्शी तालुक्यातील थरार : झोपेत मारण्याचा प्रयत्न

Husband tries to shock his wife from the roof of the house! He absconds after the attempt fails
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारूच्या आहारी गेलेल्या पतीने विद्युत खांबावर आकडा टाकून घरात झोपलेल्या होमगार्ड पत्नीला विद्युत शॉक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नी वाचली. चामोर्शी तालुक्याच्या नागपूर (चक) या गावात ५ फेब्रुवारीला हा थरार घडला. याप्रकरणी चामोर्शी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला असून पती फरार आहे. आशा माणिक सोयाम (४०) असे त्या होमगार्ड महिलेचे नाव आहे. त्या माहेरी नागपूर (चक) येथे वास्तव्यास आहेत.
पती संतोष मारोती शेडमाके (४५, रा. धानापूर, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) हा मजुरी काम करतो. गेल्या काही दिवसांपासून तो दारूच्या आहारी गेलेला आहे. यातून तो आशा सोयाम यांच्याशी सतत वाद घालायचा. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी त्या घरी झोपलेल्या होत्या. पहाटे दोन वाजता संतोष शेडमाके हा घराच्या छतावर चढला. त्याने विद्युत खांबावरून आकडा टाकून वीज घेतली व लाकडी काडीच्या साहाय्याने कवेलू बाजूला सारून आशा यांना शॉक दिला. त्यांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले असता कवेलून संतोष डोकावल्याचे दिसले. यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता त्याने धूम ठोकली. याबाबत आशा सोयाम यांनी फिर्याद दिली.
दोघांचाही पुनर्विवाह
आशा सोयाम यांच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाले, तर संतोष शेडमाके याने पत्नीशी फारकत घेतली. २०१५ पासून या दोघांनी पुनर्विवाह केला व एकत्रित राहू लागले. मात्र, नंतर संतोषला व्यसन जडले व त्यातून दोघांत खटके उडू लागले.
याआधी घरासमोर लावली होती आग
२९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष शेडमाके याने घराच्या समोरील चाफ्याच्या झाडाला डिझेल टाकून आग लावली, यावेळी आशा सोयाम यांनी आरडाओरड केल्यावर तो पळून गेला. याबाबत त्यांनी तेव्हाच पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.