मालेवाडा पोलिसांच्या मारहाणीमुळे पती बेपत्ता
By Admin | Updated: January 28, 2017 01:18 IST2017-01-28T01:18:23+5:302017-01-28T01:18:23+5:30
आपल्या पतीला मालेवाडा पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी त्यांना मारहाण केली.

मालेवाडा पोलिसांच्या मारहाणीमुळे पती बेपत्ता
पत्नीचा आरोप : एसपींकडे तक्रार
धानोरा : आपल्या पतीला मालेवाडा पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे माझे पती उमाजी गावडे हे गेल्या ११ दिवसांपासून बेपत्ता आहेत, अशी तक्रार पत्नी उर्मीला गावडे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
धानोरा तालुक्यातील मुस्का येथील उमाजी गावडे यास कोणतेही कारण नसताना १६ जानेवारी रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी मालेवाडा पोलीस ठाण्यात बोलाविले. यावेळी त्यांच्यासोबत नातेवाईक चिंतामन दुग्गा होते. पोलिसांनी उमाजी गावडे यास लाथाबुक्क्याने मारहाण केली, असे पत्नी उर्मीला गावडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. माझे पती उमाजी गावडे हे ११ दिवसांपासून बेपत्ता असल्याने मालेवाडाचे पोलीस अधिकारी कनसे यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी उर्मिला गावडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)