शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:14 IST2019-08-15T00:13:31+5:302019-08-15T00:14:01+5:30
संततधार पावसाने जुलै महिन्याची अखेर व आॅगस्ट महिन्याची सुरूवात झाली. याच संततधार पावसाने पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोर धरल्याने कोरडेठाक पडलेले नदी, नाले, तलाव, बोड्या जलमय होऊन ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गाढवी नदीची पाणीपातळी वाढली असल्याने नदी किनाऱ्यालगतचे शेकडो हेक्टरवरील धानपीक पाण्यात बुडाले आहे.

शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : संततधार पावसाने जुलै महिन्याची अखेर व आॅगस्ट महिन्याची सुरूवात झाली. याच संततधार पावसाने पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोर धरल्याने कोरडेठाक पडलेले नदी, नाले, तलाव, बोड्या जलमय होऊन ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गाढवी नदीची पाणीपातळी वाढली असल्याने नदी किनाऱ्यालगतचे शेकडो हेक्टरवरील धानपीक पाण्यात बुडाले आहे.
मागील १५ ते २० दिवसांत गाढवी नदी तीन ते चार वेळा फुगली. पाणीपातळी वाढल्याने परिसरातील धानपीक पाण्याखाली आले. याचा परिणाम धानपिकाच्या वाढीवर होत आहे. काही शेतकऱ्यांनी धानपिकाची नुकतीच रोवणी केली. मात्र ही रोवणीसुद्धा पाण्यात बुडाल्याने सडून जाण्याची तसेच पाण्यासोबतच्या वाळूमातीसह वाहून जाण्याची शक्यता आहे. काही सखल भागातील शेतातून पाण्याचा अनैसर्गिक प्रवाह तयार झाल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुरूवातीच्या टप्प्यात पाऊस पडत नसल्याने रोवणीयोग्य धानपºहे करपत असताना वरूणराजाने जबरदस्त हजेरी लावली. पावसामुळे रोवणी पूर्ण होण्यास मदत झाली. परंतु अतिपावसामुळे सखल भागातील शेतजमिनीतील रोवणीचे काम अद्यापही प्रलंबित आहे. गेल्या २० दिवसांपासून सर्वत्र पाणीचपाणी आहे. कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस होत असल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी रोवणी खोळंबली आहे.
काही ठिकाणी धान रोवणीचे काम सुरू आहे. दुसरीकडे रोवणी झालेल्या शेतात पाणी साचल्यामुळे धानपिकाची वाढ होत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढवी नदी फुगली असून एकलपूर-विसोरा, शंकरपूर-चोप मार्गावरील नाले ओसंडून वाहत आहेत. विसोरा-शंकरपूर मार्गालालगतच्या शेकडो हेक्टर शेतजमिनीतील धानपीक पाण्यात बुडाले आहे. शंकरपूरवरून चोपला जाताना दोन्ही बाजूच्या बहुतांश शेतजमिनींना आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
जिकडेतिकडे पाणीचपाणी पसरले आहे. शंकरपूर-चोप मार्गावरील नाल्यावर पाणी सोडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती.