उच्च शिक्षणातून मानवी मूल्ये रुजावी – डॉ. लालसिंग खालसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST2021-07-14T04:42:29+5:302021-07-14T04:42:29+5:30
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील राज्यशास्त्र, ...

उच्च शिक्षणातून मानवी मूल्ये रुजावी – डॉ. लालसिंग खालसा
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘उच्च शिक्षण आणि आदर्श नागरिक’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे ऑनलाइन स्वरूपात आयोजन करण्यात आले होते.
चर्चासत्राला हेरिटेज फाउंडेशन जळगावचे साधनव्यक्ती भुजंग बोबडे, श्यामलाल महाविद्यालय, नवी दिल्लीचे प्रा. विवेकानंद नरताम, प्रा. डॉ. दिवाकर सिंग राजपूत, प्रा. डॉ. हरिसिंग गौर, प्रा. डॉ. बलवान गौतम आदी उपस्थित हाेते.
चर्चासत्रप्रसंगी साधनव्यक्ती भुजंग बोबडे यांनी ‘२१ व्या शतकातील आव्हाने आणि आदर्श नागरिक’ या विषयावर मार्गदर्शन करताना आज तंत्रज्ञानाच्या युगात व्यक्तीचा समाज, कुटुंब व गुरुजन यांच्यासोबत संवाद तुटल्याने मानवी मूल्यांचा ऱ्हास होताना दिसतो. म्हणून उच्च शिक्षणातून व्यक्तीमध्ये मानवी मूल्ये रुजविल्यास खरा आदर्श नागरिक घडू शकेल, अशी भूमिका मांडली. साधनव्यक्ती प्रा. विवेकानंद नरताम यांनी ‘उच्च शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण आणि आदर्श नागरिक’ या विषयावर मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्रात ३००च्या वर संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी झूम आणि यूट्यूब प्लॅटफॉर्मद्वारे सहभाग नोंदविला. चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा. प्रियदर्शन गणवीर यांनी केले. साधनव्यक्तींचा परिचय डॉ. गजेंद्र कढव यांनी करून दिला, तर आभार राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गजानन बोरकर यांनी मानले. चर्चासत्राकरिता डॉ. गजेंद्र कढव, प्रा. गजानन बोरकर, सल्लागार समिती प्रा. नोमेश मेश्राम, डॉ. विजय रैवतकर, प्रा. डॉ. किशोर वासुर्के, प्रा. वैभव पडोळे, प्रा. डॉ. सतीश कोला, प्रा. सुनील चुटे यांनी सहकार्य केले.