बँकांमध्ये उसळली ग्राहकांची प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST2021-03-31T04:37:21+5:302021-03-31T04:37:21+5:30
गडचिराेली : १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष असते. आर्थिक वर्षाचा जमाखर्चाचा अथवा हिशेब ३१ मार्च राेजी ...

बँकांमध्ये उसळली ग्राहकांची प्रचंड गर्दी
गडचिराेली : १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष असते. आर्थिक वर्षाचा जमाखर्चाचा अथवा हिशेब ३१ मार्च राेजी आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्व संस्था पूर्ण करीत असतात. दरम्यान आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी गडचिराेली शहरासह जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी बँकांमध्ये ३० मार्च राेजी मंगळवारला ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली. प्रत्येक बॅंकेच्या प्रवेशद्वारावर दुपारच्या सुमारास नागरिकांची रांग लागली हाेती.
हाेळी सणानिमित्त बँकेला सुटी हाेती. शनिवार, रविवार व साेमवार असे तीन दिवस ग्राहकांना आर्थिक व्यवहार करता आले नाही. दरम्यान आपल्या बचत व चालू खात्यात पैसे जमा करणे, पैसे विड्राल करणे, प्राप्त झालेले धनादेश जमा करणे, बाहेरगावी असलेल्या आप्तेष्ट व नातेवाईकांना रक्कम पाठविणे आदीसह विविध प्रकारचे व्यवहार नागरिकांनी दिवसभरात केले.
गडचिराेली, देसाईगंज, चामाेर्शी, आरमाेरी, अहेरी हे तालुके विकसित असून येथे व्यापारी व व्यावसायिकांची संख्या माेठी आहे. विविध प्रकारचे टॅक्स भरणे व इतर प्रकारचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकांसह त्यांचे प्रतिनिधींनीही आज बॅंका गाठल्या हाेत्या. शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे अकाऊंटंट, अकाऊंटंटचे मदतनीस आदींनी बॅंकांमध्ये जाऊन रांगेत लागून आर्थिक व्यवहार पूर्ण करून घेतले. विविध विभागाचे कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी तसेच इतर नागरिकांनीही धावपळ करीत आर्थिक वर्ष संपण्याला एक दिवस शिल्लक असताना मंगळवारी आपले बचत व चालू खाते असलेल्या बॅंकेत जाऊन आर्थिक व्यवहार पूर्ण करून घेतले. शिवाय काही कर्जदारांनीसुद्धा कर्जाचे हप्ते भरून घेतले.
बाॅक्स ....
अनेकांनी भरले पीक कर्ज व विम्याचे हप्ते
पीक कर्ज वाटण्याची सरकारकडून याेजना राबविली जाते. या याेजनेंतर्गत सर्व राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. ३१ मार्च २०२१ पर्यंत पीक कर्ज भरण्याची अंतिम मुदत हाेती. या तारखेच्या आत ज्यांनी या पीक कर्जाचा भरणा केला, त्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्यास सवलतीचा लाभ मिळाला.
भारतीय जीवन विमा निगम व इतर विमा कंपन्यांचे वार्षिक, अर्धवार्षिक, मासिक, त्रैमासिक हप्ते भरण्याचे अनेक विमा खातेदारांचे शिल्लक हाेते. आर्थिक वर्ष संपण्याच्या अखेरीस अनेक विमा पाॅलिसी धारकांनी आपले हप्ते भरून घेतले. विमा कंपन्यांच्या अभिकर्त्यांनी विमा पाॅलिसी कार्यालय व भरणा केंद्रामध्ये दिवसभर गर्दी केली हाेती.