गडचिरोली : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा युवकांना भरधाव मालवाहू ट्रकने चिरडले. यात दोघे जागीच ठार झाले तर तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आणखी तिघे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गडचिरोली - आरमोरी मार्गावरील काटली गावानजीक ७ ऑगस्टला पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून महामार्गावर ठिय्या देत आंदोलन सुरू केले आहे.
तनवीर बालाजी मानकर (१६), टिंकू नामदेव भोयर (१४), दुष्यांत दुर्योधन मेश्राम (१५) अशी मयतांची नावे असून तुषार राजू मारबते (१४), आदित्य धनंजय कोहपरे (१४), क्षितीज तुळशीदास मेश्राम (१३, सर्व रा. काटली ता. गडचिरोली) यांचा जखमींत समावेश आहे. हे सर्व जण नित्याप्रमाणे ७ ऑगस्टला पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडले. गडचिरोली - आरमोरी मार्गावर व्यायाम करत असताना गडचिरोलीहून आरमोरीकडे निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. यानंतर तो ट्रकसहपसार झाला.
तनवीर मानकर व टिंकू भोयर यांचा जागीच मृत्यू झाला तर दुष्यांत मेश्राम याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. उर्वरित तिघांवर उपचार सुरु असून यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर गडचिरोली ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गावावर शोककळा, रुग्णालयात गर्दी एकाचवेळी तीन युवकांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले होते. जिल्हा रुग्णालयात गावकरी व नातेवाईकांनी गर्दी केली. दवाखान्यात आणि काटली गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ग्रामस्थांमध्ये रोष, महामार्ग अडविला ट्रकच्या धडकेत तीन मुलांच्या मृत्यूनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. चालकास ताबडतोब अटक करा, गावात मुलांना व्यायाम करण्यासाठी मैदान तयार करा, मृतांच्या नातेवाईकांना भरपाई द्या आधी मागण्यांसाठी ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या देत आंदोलन सुरू केले. शेकापचे रामदास जराते, जयश्री वेळदा, माकपचे अमोल मारकवार आदींनी गावात धाव घेतली. ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत गावाजवळून मालवाहतूक बंद करा, अशी मागणी देखील केली. सरपंच अरुण उंदीरवाडे, उपसरपंच पर्वता खेडकर यांनी जिल्हाधिकारी व एसपी यांनी घटनास्थळी येऊन याबद्दल आश्वासन द्यावे, अशी मागणी केली. पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण गावकरी मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.