ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित
By Admin | Updated: May 11, 2014 23:37 IST2014-05-11T23:37:22+5:302014-05-11T23:37:22+5:30
गडचिरोली जिल्ह्याला निसर्ग संपत्तीचे भरभरून वरदान मिळाले असून प्राचीन काळी अनेक समृद्ध संस्कृती या भागात नांदल्याचे येथील पुरातन मंदिरे व गडकिल्ल्यांना बघून लक्षात येते.

ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला निसर्ग संपत्तीचे भरभरून वरदान मिळाले असून प्राचीन काळी अनेक समृद्ध संस्कृती या भागात नांदल्याचे येथील पुरातन मंदिरे व गडकिल्ल्यांना बघून लक्षात येते.पण, महाभारतकालीन राजा विराटपासून गोंडराजांपर्यंतच्या वैभवशाली राजवटीची साक्ष देणारी ऐतिहासिक स्थळे आता नामशेष होताना दिसत आहेत. या ऐतिहासिक स्थळांच्या जतनाकडे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना शासनही याबद्दल उदासीनच दिसत आहे. झाडीपट्टी मोडणार्या या जिल्ह्यात वैरागडचा किल्ला, भंडारेश्वर मंदिर, अरततोंडी, विदर्भाची काशी अशी ओळख असलेले मार्कंडेश्वर मंदिर, निसर्गरम्य टिपागड अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील भंडारेश्वर मंदिर व ऐतिहासिक किल्ला शेवटच्या घटका मोजत आहे. येथील किल्ल्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी मागील वर्षभरापासून खोदकाम करून ठेवले आहे.पण, शासनाचे उदासीन धोरण व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असल्याने सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. वैरागड येथे हिर्याची खाण असल्याचा प्राचीन इतिहासात उल्लेख आहे. संशोधनाअंती येथे हिरे असल्याचेही सिद्ध झाले आहे. मात्र, येथील परीसराचा विकास करण्याचे कोणतेच धोरण शासनाने कधी आखले नाही. चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तिरावर मार्कंडेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील शिल्पाकृती खजुराहो येथील शिल्पाकृतीच्या तोडीच्या आहेत.पण, या शिल्पाकृतीचे व मंदिराचे जतन करण्याचे वेगवान प्रयत्न अद्यापही झाले नाही. महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा भरते.पण, या यात्रेसाठीही जागा उपलब्ध करून देण्याकडे शासन कानाडोळा करीत आहे. विशेष म्हणजे मार्कंडेश्वर मंदिरासारखी आणखी काही मंदिरे जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे.पण, येथे इतिहास संशोधकही फिरकत नाहीत. त्यांच्या संशोधनाला वाव मिळेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल यासाठीही कोणतेच प्रयत्न होत नाही. इतिहास संशोधकांना येथे पाचारण करण्यात आल्यास जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे अवशेष निश्चित मिळू शकतात.पण, असंख्य समस्यांच्या विळख्यातील या जिल्ह्यातील हा ऐतिहासिक वारसा समस्येने ग्रस्तच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)