किष्टापूर येथे इसमाची हत्या
By Admin | Updated: October 25, 2015 01:19 IST2015-10-25T01:19:43+5:302015-10-25T01:19:43+5:30
आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत क्रिष्टापूर (टोला) येथे शेतीच्या वादातून एका इसमाची हत्या झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

किष्टापूर येथे इसमाची हत्या
आरोपी फरार : शेतीच्या वादातून घडले प्रकरण
आष्टी : आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत क्रिष्टापूर (टोला) येथे शेतीच्या वादातून एका इसमाची हत्या झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. नामदेव पोचन्ना पुरमवार (५८) रा. किष्टापूर असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.
तर या प्रकरणातील आरोपी नामदेव राजन्ना संघावार रा. किष्टापूर टोली हा फरार आहे. प्राप्त माहितीनुसार नामदेव पोचन्ना पुरमवार हा मुळचा किष्टापूर येथील रहिवासी असून तो सध्या नागपूर येथे वास्तव्यास होता. त्याची शेती किष्टापूर येथे आहे. शेती पाहण्यासाठी पुरमवार हा नागपूरवरून शुक्रवारी किष्टापूर येथे आला होता. दरम्यान नामदेव संघावार व पुरमवार यांच्यात शेतीच्या विषयावरून वाद झाला. गावातील लोकांनी मध्यस्ती करून या दोघांचा वाद सोडविला. त्यानंतर नामदेव पुरमवार हा नागपूरला जाण्यासाठी निघाला असता, पुन्हा त्याला गावात गाठून नामदेव संघावार याने त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर नागपूरला जाण्यास अड्याळ बसथांब्यावर पुरमवार आला असता, या ठिकाणीही संघावार याने त्याला मारझोड केली व तिथून संघावार पसार झाला. पुरमवार यांचे नातेवाईक अड्याळ येथे पोहोचून त्याला घरी नेण्यासाठी गेले असता, पुरमवार हा वडाच्या झाडाखाली झोपून राहिला. या ठिकाणी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने तो तिथेच मृत पावला. त्यांचा मुलगा रमेश पुरमवार याने आष्टी पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दाखल केली. या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी आरोपी नामदेव संघावार याचेवर भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुरमवार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात आणला. आरोपी नामदेव संघावार हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आष्टीचे पोलीस निरिक्षक उमेश बेसरकर, पोलीस उपनिरिक्षक गोहणे, सहायक फौजदार फुलझेले, पोटवार करीत आहेत. या घटनेमुळे आष्टी परिसरात खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)