होमगार्डची नोकरी धोक्यात
By Admin | Updated: June 28, 2017 02:26 IST2017-06-28T02:26:16+5:302017-06-28T02:26:16+5:30
१२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या होमगार्डची सेवा समाप्त करून नवीन नोंदणी करण्याचे आदेश उपमहासमादेशकांनी

होमगार्डची नोकरी धोक्यात
बेरोजगारीचे संकट : १२ वर्ष सेवा झालेल्यांना कमी करण्यास सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या होमगार्डची सेवा समाप्त करून नवीन नोंदणी करण्याचे आदेश उपमहासमादेशकांनी काढल्याने राज्यातील जवळपास ३० हजार होमगार्डची नोकरी धोक्यात आली आहे. त्यामुळे होमगार्ड जवानांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ७६ होमगार्डला कमी करण्यात आले आहे.
होमगार्ड अधिनियम १९५३ मधील नियम ८ नुसार पूर्ण नियुक्तीकरिता या शासन निर्णयात बदल केला आहे. त्या बदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली नाही. त्या बदलास आवश्यक असलेली राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद या दोन्ही सभागृहांची संमती घेतली नाही. त्यानुसार हा बदल अवैध ठरत असल्याने शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी होमगार्ड जवानांनी केली आहे. मुंबई होमगार्ड नियमानुसार नियुक्ती केलेली व्यक्ती नोंदणीस पात्र असेल तर ती वयाच्या ५५ वर्षांपर्यंत होमगार्डचे काम करू शकते. मात्र १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या होमगार्डची सेवा समाप्त केली जात आहे. त्यांना कामावरून काढले जात असल्याने होमगार्डमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
होमगार्डच्या संघटनेने २१ जुलै २०१६ मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी सदर आदेश तत्काळ स्थगीत करावा, असे पत्र समादेशकांना दिले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्राला न मानताच १२ वर्ष पूर्ण केलेल्या होमगार्ड सैनिकांना संघटनेतून काढले जात आहे. कोणतेही निर्णय घेण्याचा किंवा परिपत्रक काढण्याचा अधिकार महासमादेशक यांना दिला असताना उपसमादेशक अधिकार नसतानाही निर्णय घेत आहेत. त्यांच्या या चुकीच्या कार्यपद्धतीवर अंकुश लावण्यात यावा, अशी मागणी होमगार्ड संघटनेने केली आहे. होमगार्ड संघटनेने नेमणुकांवर बहिष्कारही घातला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. कामावरून काढल्याने होमगार्ड बेरोजगार झाले आहेत.
७६ होमगार्डची सेवा समाप्त
नवीन नियमाचा फटका गडचिरोली जिल्ह्यातील ७६ होमगार्डला बसला आहे. गडचिरोली कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या १४ होमगार्डला सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्याचबरोबर आरमोरी तालुक्यातील २५, देसाईगंज तालुक्यातील ३३, चामोर्शी १, अहेरी २ व सिरोंचा तालुक्यातील १ होमगार्डला कमी करण्यात आले आहे. १२ वर्षांची सेवा अत्यंत तुटपुंज्या मानधनावर करूनही त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने होमगार्ड स्वयंसेवक संतप्त झाले आहेत.