वारी खंडित झाल्याने भाविकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:45+5:302021-07-15T04:25:45+5:30
भेंडाळा परिसरात असलेल्या मुरखळा या गावात गेल्या दहा- बारा वर्षांपूर्वी वारकरी संप्रदाय मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार संत तुकाराम, ...

वारी खंडित झाल्याने भाविकांचा हिरमोड
भेंडाळा परिसरात असलेल्या मुरखळा या गावात गेल्या दहा- बारा वर्षांपूर्वी वारकरी संप्रदाय मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांची ज्योत तळागाळातील भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे वारकऱ्यांची संख्या वाढत जाऊन पंचक्रोशीत वारकऱ्यांचे गाव म्हणून मुरखळा गावाला ओळखले जाऊ लागले आहे. वारकरी दरवर्षी पंढरपूर यात्रेला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन येत असत. मात्र कोरोना महामारीमुळे वारकऱ्यांना वारी करता आली नसल्याची खंत जाणवत आहे.
‘‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा ध्यास,
पंढरीचा वारकरी, वारी चुकूने दे हरी...’’
म्हणत वाजत गाजत, टाळ-मृदंगाचा गजर करीत हरिनामाचा जयजयकार करीत मोठ्या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांच्या पंढरपूर वारीसाठी भक्तगण रवाना होत होते. मात्र कोरोना महामारी संकटाने वारकऱ्यांना घरबसल्या साधेपणाने पूजाअर्चा करावी लागणार आहे.
गावा-गावात श्रावण महिन्यात भजन, पूजन, यासोबतच गावा-गावात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. मात्र गतवर्षीपासून या परंपरेत खंड पडला आहे. मराठी महिन्यातील श्रावण महिना धार्मिकदृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो. या महिन्यात पोथी, पुराण वाचले जाते व भजन-पूजन केले जात असते. रात्रीच्या सुमारास टाळ, मृदंग, पखवाज यांचे स्वर कानी पडत असतात. मात्र कोरोनामुळे याला ब्रेक लागला आहे. वारकरी मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन येत असत. न चुकता कार्तिकी व आषाढी यात्रेला जात होते. मात्र सलग दुसऱ्याही वर्षी वारकऱ्यांची वारी परंपरा खंडित झाली आहे.
बॉक्स :
साधेपणाने पूजाअर्चा हाेणार
कोरोना महामारी संकटामुळे शासनाने काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. कोरोना महामारीचे संकट अजूनही संपलेेले नाही. त्यामुळे सर्वांनी घरीच राहून साधेपणाने पूजाअर्चा करावी, शासनाने सुरू केलेल्या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे धनराज महाराज नागापुरे यांनी आवाहन केले आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिकी व आषाढी यात्रेला पंढरपूरला जात होतो. मात्र कोरोनामुळे वारी खंडित पडली असून, यावर्षी साधेपणाने पूजाअर्चा केली जाणार असल्याचे वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष धनराज महाराज नागापुरे यांनी सांगितले.
140721\img-20210714-wa0192.jpg
मुरखडा येथील वारकरी मंडळी