शेतकऱ्यांना उच्चदाबाचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:10 IST2018-12-17T00:10:02+5:302018-12-17T00:10:32+5:30
महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) गडचिरोली मंडळातील ८९९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

शेतकऱ्यांना उच्चदाबाचा पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) गडचिरोली मंडळातील ८९९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
या योजनेंतर्गत एका वितरण रोहीत्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततचा विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची आता कायमची सुटका होणार आहे. या योजअंतर्गत ३१ मार्च २०१७ सोबतच ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एचव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे.
या आधुनिक तंत्राचा (एचव्हीडीएस) वापर करून अधिक व्होल्टेज असलेल्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मयार्दीत ठेवत शेतकऱ्यांना पुरेशी वीज देता येणे शक्य आहे. त्यामुळे आकडा टाकून होणाऱ्या वीजचोरीसही आळा बसणार आहे. कृषी पंपांना शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
चंद्रपूर विभागातील घुग्गूस तालुक्यातील वेंडली गावातील संजय नागापूरे , बल्लारषा विभागातील पोंभूर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी गावातील जनार्धन खोब्रागडे , गडचिरोली मंडलातील पारडी गावातील भास्कर सितकुरा गंडाटे, चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई हरीदास देवतेळे यांच्याकडे वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई हरीदास देवतेळे यांनी महावितरणच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. उच्च वीजदाबामुळे कापसाचे पीक घेण्यास मदत झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
गडचिरोली तालुक्यातील पारडी गावातील भास्कर सितकुरा गंडाटे यांच्या सव्वादोन एकर शेतात आता पाण्याची सोय झाल्याने धानाचे पीक चांगल्याप्रकारे घेता आले आहे. रबीतही उत्पादन घेण्याचा संकल्प केला आहे.