गडचिरोली : हिवाळा ऋतू आरोग्यासाठी हेल्दी मानला जात असला तरी कडाक्याच्या थंडीमुळे हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित पावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत हृदयविकार, लकव्याचा धोका अधिक वाढतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
आता तिशीतही हृदयविकार सध्याच्या काळात तारुण्यात येणाऱ्या हार्ट अटॅकमागे त्यांच्या कौटुंबिक इतिहासात मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असू शकतात. तसेच धूम्रपान, मद्यपान, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि ताण ही सुद्धा कारण आहेत. त्यामुळे युवकांनी व्यसनापासून दूर राहणे, गरजेचे आहे.
आहार कसा घ्याल? थंडीच्या दिवसांत कोलेस्ट्रॉल, शुगरचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारामध्ये तूप, तेल, मैदा, बेसन, मीठ अशा पदार्थांचे संतुलन राखावे. शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी फळांचे सेवन करावे.
रक्ताभिसरण होते कमी थंडीच्या दिवसांत ब्लड सर्क्युलेशन कमी होते आणि त्यामुळे रक्तवाहिन्या गोठतात, आकुंचित पावतात. यामुळे हृदयरोगाने त्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराची समस्या वाढते. थंडीमुळे ज्येष्ठांना हृदयविकार, लकव्याचा सर्वाधिक धोका असतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
अशी घ्या काळजी..
- थंडीपासून बचावासाठी वृद्धांनी उबदार कपड्यांचा वापर करावा.
- कानात थंड हवा जाणार नाही, यासाठी कानाला रुमाल बांधावा.
- सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ घालवावा.
- रक्तदाब, मधुमेह व कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करावी.
"हिवाळ्यात कमी तापमानामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. यामुळे रक्तप्रवाह रोखू शकतो. ज्यामुळे हृदयावर अधिक दबाव येतो. हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी. अधिक समस्या असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा." - डॉ. प्रशांत कारेकर, फिजिशियन, गडचिरोली.