जिमलगट्टात १,३४२ जणांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:32+5:30
दुर्गम भागातील नागरिक अनेक आजारांनी त्रस्त राहतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सदर नागरिक उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे दु:खाचे जीवन कंठावे लागते, ही बाब लक्षात घेऊन एफडीसीएमने जिमलगट्टा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील गावखेड्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

जिमलगट्टात १,३४२ जणांची आरोग्य तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : एफडीसीएम सीएसआर ट्रस्ट व दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिमलगट्टा येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान १ हजार ३४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन एफडीसीएम नागपूरचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एफडीसीएमचे डॉ. एम. रानबाबू होते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय व्यवस्थापक एस. आर. पाटील, महाव्यवस्थापक ऋषीकेष रंजन, सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमीत कुमार, वन परिक्षेत्राधिकारी भोयर, प्रशील जुमडे, डीएफओ नवलकिशोर रेड्डी, सहायक व्यवस्थापक मुंडे, सुधीर शिंपले, पटलवार, सहायक व्यवस्थापक पंकज उईके, सरपंच सरीता गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुर्गम भागातील नागरिक अनेक आजारांनी त्रस्त राहतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सदर नागरिक उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे दु:खाचे जीवन कंठावे लागते, ही बाब लक्षात घेऊन एफडीसीएमने जिमलगट्टा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील गावखेड्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काही नागरिकांना गंभीर आजार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वर्धा व इतर ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनाने अनेक योजना लागू केल्या आहेत. महात्मा फुले योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अनेक रोगांवर मोफत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन उपचार करावे, असे आवाहन केले. संचालन आनंद अलोणे तर आभार दत्तात्रय कुकडे यांनी मानले.
४५० रूग्णांवर उपचार
यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी जिमलगट्टा येथेच आरोग्य तपासणी शिबिर घेऊन १ हजार १५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ४५० रूग्णांना गंभीर आजार आल्याचे आढळून आले. त्यांना सावंगी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. हा सर्व खर्च एफडीसीएमच्या सीएसआर फंडातून करण्यात आला आहे.
नागरिकांच्या लागल्या रांगा
आरोग्य तपासणी शिबिरासाठी गावखेड्यातून शेकडो नागरिक उपस्थित होते. त्यामुळे तपासणी शिबिर ठिकाणी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वृध्द नागरिक, महिलांनीही सुध्दा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.