Health center started at Gopanar | गोपनार येथे आरोग्य केंद्र सुरू

गोपनार येथे आरोग्य केंद्र सुरू

ठळक मुद्देदुर्गम भागातील नागरिकांना मिळणार सेवा : लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या गोपनार गावात लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील गावांमधील नागरिकांना आरोग्याची सुविधा पुरविली जाणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलींद सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी रुग्णालयाचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, साहित्यिक व ज्येष्ठ कार्यकर्ते विलास मनोहर, रेणुका मनोहर, डॉ.निलोफर बिजली आदी उपस्थित होते.
गोपनार गावाच्या सभोवताल होडरी, लष्कर, आलदंडी, मोरडपार, धिरंगी ही आदिवासीबहुल गावे आहेत. या भागात आरोग्याच्या सुविधा नाहीत. लाहेरी, भामरागड या ठिकाणी शासकीय रुग्णालय आहेत. मात्र ही दोन्ही गावे गोपनारपासून बरेच दूर आहेत. एखाद्या रुग्णावर वेळेवर प्राथमिक उपचार न झाल्यास त्याच्या जीवास धोका राहते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. दुर्गम भागातील नागरिकांना सुविधा मिळावी, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आले.
दवाखान्यासाठी पक्की सिमेंटची इमारत व रुग्णांसाठी शेड उभारला जाणार आहे. सदर केंद्र नियमित सुरू ठेवले जाईल व नागरिकांना विनामूल्य सेवा दिली जाईल. औषधीही दिली जाईल. उद्घाटनाच्या वेळी जगदीश बुरडकर, शारदा ओक्सा, गणेश हिवरकर, अशोक गायकवाड, प्रकाश मायरकर, दीपक सुतार, संध्या येम्पलवार, बिरजू दुर्वा हजर होते.

दुर्गम भागातील नागरिक भारावले
लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने भामरागड तालुक्यातील गोपनार येथे आरोग्य केंद्र सुरू केले आहे. सदर गाव अतिशय दुर्गम भागात वसले आहे. प्राथमिक उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होताना येथील नागरिकांनी बघितले आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने त्यांच्यासमोर काहीच पर्याय नव्हता. मात्र लोकबिरादरी प्रकल्पाने गोपनारसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. परिसरातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दुर्गम भागातील नागरिक उपस्थित होते. आरोग्य सुविधा मिळणार असल्याने नागरिक भारावले.

Web Title: Health center started at Gopanar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.