Health camp planted in Kambalpetha | कंबलपेठात लावले आरोग्य शिबिर

कंबलपेठात लावले आरोग्य शिबिर

ठळक मुद्दे१५ नागरिकांवर उपचार : कुकुटपालन केंद्रातील दुर्गंधीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : अंकिसा परिसरातील कंबालपेठा येथील १५ नागरिकांची अचानक प्रकृती बिघडल्याने या गावात आरोग्य विभागाने उपचार शिबिर आयोजित केले. या शिबिरात उपचार घेतल्यानंतर त्यांची सुटी करण्यात आली.
कंबालपेठा गावाला लागूनच कुकुटपालन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या कुकुटपालन केंद्राला गावकऱ्यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे गावकऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने कुकुटपालन केंद्रावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे कुकुटपालन केंद्र सुरूच आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे कोंबड्या तसेच त्यांच्या विष्ठेची दुर्गंधी गावात पसरायला लागली.
सततच्या दुर्गंधामुळे कंबालपेठा येथील सारक्का येरोला, लावण्या गग्गुरी, सारक्का बद्दी, अक्षय बोेरेम, जगदीश बद्दी यांच्यासह अन्य १५ नागरिकांना उलट्या, मळमळ, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता. याची माहिती अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण आरोग्य कर्मचारी गावात पोहोचले. गावातच शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरादरम्यान डॉ.फाले, डॉ.पी.व्ही.आदर्श, रवी अंडले, धारणे, नितीन वनमामुला यांनी सहकार्य केले. या गावात असलेल्या कुकुटपालन केंद्रामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नागरिकांवर गाव सोडण्याची नामुष्की
कुकुटपालन केंद्रातील दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांचे आरोग्य वेळोवेळी बिघडत चालले आहे. विशेषकरून लहान मुलांना विविध व्याधी होण्यास सुरूवात झाली आहे. भविष्यात या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या जीवावर बेतणारे कुकुटपालन केंद्र हलवावे, याबाबत स्थानिक गावकºयांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र प्रशासनातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. नाईलाजास्तव गाव सोडून दुसरीकडे स्थायी होण्याची नामुष्की गावकºयांवर आली आहे.

Web Title: Health camp planted in Kambalpetha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.