मुख्याध्यापकांनी केला संचमान्यतेत घोळ
By Admin | Updated: December 20, 2014 22:40 IST2014-12-20T22:40:14+5:302014-12-20T22:40:14+5:30
तालुक्यातील अमिर्झा येथील कर्मवीर महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांना वाचविण्यासाठी संचमान्यतेदरम्यान कायम विनाअनुदानित तुकडी अनुदानावर दाखविली,

मुख्याध्यापकांनी केला संचमान्यतेत घोळ
गडचिरोली : तालुक्यातील अमिर्झा येथील कर्मवीर महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांना वाचविण्यासाठी संचमान्यतेदरम्यान कायम विनाअनुदानित तुकडी अनुदानावर दाखविली, असा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याच विद्यालयातील कायम विनाअनुदानित तुकडीवरील शिक्षक महेश पुटकमवार यांनी केली आहे.
कर्मवीर विद्यालयातील आठव्या वर्गाच्या कायम विनाअनुदानित तुकडीवर सहाय्यक शिक्षक म्हणून आपण रूजू झालो. शासनाने खासगी संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये कर्मवीर विद्यालयातील अनुदानित तुकड्यांमधील ३ शिक्षक अतिरिक्त ठरणार होते. यातील दोन शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यापासून वाचविण्यासाठी येथील मुख्याध्यापक कंदुकवार यांनी कायम विनाअनुदानित असलेली तुकडी अनुदानावर असल्याचे संचमान्यतेमध्ये दाखविले व त्यासाठी आवश्यक असलेल्या दोन शिक्षकांचे समायोजन थांबविले. त्यानंतर या कायम विनाअनुदानित तुकडीवर कार्यरत असलेल्या पुटकमवार यांना सेवा ज्येष्ठता यादीनुसार अतिरिक्त ठरविण्यात आले. कायम विनाअनुदानित तुकड्यांमध्ये काम करीत असलेल्या शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याचा नियम नसतानाही मुख्याध्यापकांनी अतिरिक्त ठरविले.
मुख्याध्यापकांनी शासनाची व आपली फसवणूक केली आहे. कायम विनाअनुदानित तुकडीवर शिकवित असलेल्या शिक्षकांना संस्थेने वेतन द्यावे, असा शासन निर्णय आहे. मात्र दोन वर्षांपासून संस्थेने आपल्याला वेतन दिले नाही. असाही आरोप पुटकमवार यांनी केला आहे.
या संदर्भात कर्मवीर विद्यालय अमिर्झाचे मुख्याध्यापक आर. डी. कुंदकवार यांना विचारणा केली असता, त्यांनी शाळेच्या संचमान्यतेमध्ये कायम विनाअनुदानित तुकडी अनुदानित दाखविण्यात आली असल्याचे मान्य केले. ही चूक आपली नसून शिक्षण विभागाची असल्याचे सांगितले. मात्र सदर चूक आपल्या लक्षात आल्यानंतर ही चूक दुरूस्त करण्यासाठी शिक्षण विभागाकडे पत्र पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (नगर प्रतिनिधी)