मुख्याध्यापकांना हातात धरावाच लागणार खडू !
By Admin | Updated: June 28, 2014 23:32 IST2014-06-28T23:32:38+5:302014-06-28T23:32:38+5:30
१ ते ८ पर्यंतच्या शाळांची नव्याने रचना करण्यात आल्यानंतर १६० मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले होते. या मुख्याध्यापकांची पदावनती करून त्यांना पदविधर शिक्षक म्हणून नेमण्यात येणार आहे.

मुख्याध्यापकांना हातात धरावाच लागणार खडू !
१ जुलै रोजी समायोजन : १६० मुख्याध्यापकांच्या पदावनतीचा मुद्दा
गडचिरोली : १ ते ८ पर्यंतच्या शाळांची नव्याने रचना करण्यात आल्यानंतर १६० मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले होते. या मुख्याध्यापकांची पदावनती करून त्यांना पदविधर शिक्षक म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आता खडू घेऊनच शिकवावे लागणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यभरातील एक ते आठ पर्यंतच्या शाळांची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये आवश्यक असलेल्या ठिकाणी एक ते चार ला पाचवा वर्ग तर सातव्या वर्गाला आठवा वर्ग जोडण्यात आला. नवीन वर्ग रचनेनुसार फक्त १०२ मुख्याध्यापकांची पदे मंजूर आहेत. यापूर्वी २७५ मुख्याध्यापकांची पदे मंजूर होती. त्यामुळे १७३ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. १० ते १२ मुख्याध्यापक ३० जूनपर्यंत सेवानिवृत्त होणार आहेत. अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांची या ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे. हे सर्व केल्यानंतर जवळपास १६० मुख्याध्यापक अतिरिक्त ठरणार आहेत. या सर्वांना पदवीधर शिक्षक म्हणून काम करावे लागणार आहे.
बहुतांश मुख्याध्यापक अध्यापणाचे काम करीत नाही. शिकविले तरी एक ते दोनच तास शिकवितात. आता मात्र त्यांची पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने हातात खडू घेऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. हे सर्व करताना त्यांची चांगलीच दमछाक उडणार आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांची पदावनती करण्यात आली. वेतन मात्र जुनेच देण्यात येणार आहे. पदावनतीमुळे काही जणांना मुख्याध्यापक या हुद्याने निवृत्त होण्याच्या आनंदाला मुकावे लागणार आहे. तर काही जणांना आणखी काही वर्ष मुख्याध्यापकांची पदे रिक्त होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
नवीन वर्ग रचनेनुसार ८५० पदवीधर शिक्षकांची पदे मंजूर झाली आहेत. यापैकी ५५५ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पदांवर पदावनती करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात येणार आहे.
उर्वरित पदे प्राथमिक शिक्षकांमधून भरण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षकांना ६ ते ८ पर्यंत शिकविण्याची संधी मिळणार असली तरी त्यांना जुनेच वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे बरेच शिक्षक पदवीधर शिक्षक म्हणून काम करण्यास इच्छुक नाही. मात्र जे शिक्षक पदवीधर शिक्षक म्हणून काम करणार नाही, अशा शिक्षकांना अतिरिक्त ठरविले जाणार असून त्यांची यादी राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यांना राज्य शासन इतर जिल्ह्यामध्ये नियुक्ती देईल, असा हेका प्रशासनाने घेतला असल्याने शिक्षकांना मूळ वेतनावरच पदवीधर शिक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)