मुसळधार पावसात झाडाचा आसरा घेणेच बेतले त्याच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:07 PM2020-07-16T13:07:25+5:302020-07-16T13:10:15+5:30

पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरवून झाडाच्या आडोशाला गेलेल्या यश व मनीष या दोन भावंडांच्या अंगावर कडाडत वीज कोसळली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

He wanted to take shelter of a tree in the pouring rain | मुसळधार पावसात झाडाचा आसरा घेणेच बेतले त्याच्या जीवावर

मुसळधार पावसात झाडाचा आसरा घेणेच बेतले त्याच्या जीवावर

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यावर काळाची झडप शेतातील झाडावर कोसळलेल्या वीजेने घेतला बळी

महेंद्र रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : काळ हा कुणालाही सांगून येत नाही किंवा त्याची पुसटशी कल्पनाही कुणाला नसते. घरी आपल्या आजीशी बोलून डोंगरसावंगी येथील आपल्या नातेवाईकाच्या शेतावर रोवणीसाठी व पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरविण्यासाठी गेलेल्या वडधा येथील यश वेणुदास राऊत या १६ वर्षीय विद्यार्थ्यावरही वीज बनून आलेल्या काळाने अचानक झडप घातली. पऱ्ह्याच्या पेंढ्या पसरवून झाडाच्या आडोशाला गेलेल्या यश व मनीष या दोन भावंडांच्या अंगावर कडाडत वीज कोसळली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

एका झटक्यात यशला काळाने हिरावले तर त्याचा चुलत भाऊ मनीष गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. सर्वांचा लाडका असलेल्या यशच्या अचानक जाण्याने गावकरी हेलावून गेले. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. पण त्यांच्या हळहळण्याने यश परत येणार नव्हता.
यश अवघ्या दोन महिन्यांचा असताना त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले. जन्मदात्या आईचे प्रेम, वात्सल्य व ममतेचा स्पर्शही त्याला अनुभवता आला नाही. तान्ह्या वयात त्याच्या आजी व काकाने त्याला तळहाताच्या फोळाप्रमाणे जपले. त्याचा सांभाळ करून त्याला आईवडिलांचे प्रेम दिले. त्याच्या हसण्याखेळण्याने घर कसे आनंदाने न्हाऊन निघत होते.

यश हा वृद्ध आजीचा आधारवड होता. घरची परिस्थिती गरीबीची असतानाही त्याला चांगले शिक्षण देण्याचे व खूप शिकविण्याची काका व आजीची इच्छा होती. तो वडधा येथील किसान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये यावर्षी शिक्षण घेणार होता. मात्र अचानक काळाने त्याच्यावर झडप मारली आणि त्याला आपल्या कवेत घेतले. क्षणात हसत्या खेळत्या यशला आपल्यातून हिरावून नेले. जीवनात चांगले शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न बघणाऱ्या यशला हे जीवनच सोडून कायमचे निघून जावे लागले.

सोमवारी सकाळी जेवण करून आजी व काकासोबत बोलून यश इतर महिला मजुरांसोबत डोंगरसावंगी येथे गेला. यश व मनीष शेतावर धानाच्या पेंढ्या पसरवित होते. अचानक दुपारी २ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. पाऊस व कडाडणाºया विजेपासून बचाव करण्याकरिता त्यांनी बांधालगतच्या मोठ्या किनीच्या झाडाचा आसरा घेतला. दरम्यान याच झाडावर वीज कोसळली आणि क्षणातच विजेच्या धक्क्याने यशचा दुदैवी मृत्यू झाला तर मनीष गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ ट्रॅक्टरने आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती आजी कौशल्या आणि काका दिलीप यांना कळताच त्यांना धक्काच बसला. घरातील एकुलता एक असलेल्या व आजीच्या कुशीत वाढलेल्या यशच्या अचानक जाण्याने आजीसह संपूर्ण राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

शाळा बंद असल्याने झाला घात
वडधा येथील यश व मनीष राऊत या चुलत भावंडांची जोडी ही राम-लक्ष्मणासारखी होती. अत्यंत शांत, संयमी व सुस्वभावी असलेल्या यशला कुणीही कोणतेही काम सांगितले तरी तो नाही म्हणायचा नाही. दोघेही भाऊ शाळेत मिळूनच जायचे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने यावर्षी यश व मनीष हे भावंड आत्या-मामाच्या गावी डोंगरसावंगी येथे गेले. ऋषी रोहणकर यांच्या शेतात रोवणीसाठी धान रोपाच्या पेंढ्या पसरविण्यासाठी हे दोन भावंड चार ते पाच दिवसांपासून गावातील इतर मजुरांसोबत जात होते. दिवसभर शेतात पेंढ्या पसरविणे व सायंकाळी पुन्हा स्वत:च्या गावी वडधाला परतणे हा त्यांचा दिनक्रम होता.

अन् वाचला अनेकांचा जीव
डोंगरसावंगीच्या ऋषी रोहणकर यांच्या शेतातील धानपीक रोवणीच्या कामावर त्या दिवशी अनेक महिला मजूर होते. सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाल्यानंतर यश व मनिष झाडाखाली आसरा घेण्यासाठी आले. पण रोवणीचे थोडेच काम शिल्लक असल्यामुळे महिला मजूर पावसातच रोवणी करीत होत्या. पाच मिनीट आधी त्यांची रोवणी संपली असती तर सर्व मजूरही या यश आणि मनीष थांबले त्याच झाडाखाली गेले असते आणि यापेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेने त्या मजुरांना ‘काळ आला होता पण वेळ नाही’ याचा प्रत्यय आला.

Web Title: He wanted to take shelter of a tree in the pouring rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू