सुरक्षित प्रवासासाठी बसचालकांच्या डोळ्यांची तपासणी केली का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 15:56 IST2024-08-05T15:55:33+5:302024-08-05T15:56:56+5:30
स्वतंत्र तज्ज्ञ उपलब्ध : दृष्टीदोष आढळल्यास उपचार करण्याचा सल्ला

Have the eyes of the bus drivers been checked for safe travel?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बसमधील सर्व प्रवाशांचा जीव बसचालकावर अवलंबून असते. त्यामुळे बसचालक शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठीच एसटी चालकांच्या डोळ्यांची तपासणी नियमितपणे केली जाते.
चालकाचे वय जर ४० वर्षांपेक्षा कमी असेल तर दोन वर्षातून एकदा व वय जर ४० पेक्षा अधिक असेल तर एका वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. विभागातील चालकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी मानधन तत्त्वावर एसटीने एका नेत्र तज्ज्ञाची नियुक्ती केली आहे. सदर नेत्र तज्ज्ञ चालकांची तपासणी करतात. चालकाच्या डोळ्यात काही गडबड आढळल्यास तशी माहिती एसटीला सादर केली जाते. त्यामुळे चालक त्याच्या डोळ्यातील दोष एसटी प्रशासनाकडे लपवू शकत नाही. त्यावर उपचार करावे लागतात.
दरवर्षी डोळ्यांची तपासणी होते का?
चालकांच्या डोळ्ळ्यांची तपासणी करण्यासाठी एसटीने मानधन तत्त्वावर डॉक्टरची नियुक्ती केली आहे. वर्षातून एकदा डोळे तपासणी करून घेणे चालकाला सक्त्तीचे आहे.
१०० बसचालक चाळीशीनंतरचे
गडचिरोली व अहेरी आगारात मिळून एकूण ३४० बसचालक आहेत. त्यापैकी १०० चालक चाळीस वर्ष वयानंतरचे आहेत. या चालकांना वर्षातून एकदा नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे.
चाळीशीनंतर कोणत्या तपासण्या केल्या जातात?
वयाच्या ४० वर्षानंतर नेत्र तपासणीबरोबरच बीपी, शुगर आदी सामान्य तपासण्या करून घेतल्या जातात. बीपी अधिक असल्यास चालकाची तब्येत बिघडण्याची शक्यता अधिक असते.
चालकाला दृष्टीदोष असल्यास काय ?
- एसटी चालकाला दृष्टीदोष आढळून आल्यास त्याच्याकडून वाहन चालविण्याचे काम काढून घेतले जाते. त्याच्याकडे समकक्ष इतर पदाची जबाबदारी सोपविली जाते.
- वर्षभराच्या कालावधीनंतर संबंधित चालकाने नेत्र तपासणीचा अहवाल एसटीकडे सादर करणे आवश्यक आहे.
"एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देते. चालकांची दृष्टी चांगली असावी, यासाठी एसटी प्रशासन नेहमी जागरूक असते. प्रत्येक चालकाला वर्षातून एकदा नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे. चालकाच्या दृष्टीमध्ये काही दोष असल्यास त्यावर उपचार करण्याचा सल्ला संबंधित चालकाला दिला जातो."
- फाल्गुन राखडे, आगार व्यवस्थापक, गडचिरोली