जिमलगट्टा आरोग्य केंद्र समस्याग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:54 IST2018-06-04T22:54:11+5:302018-06-04T22:54:26+5:30
जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मदार असलेल्या जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्य:स्थितीत अनेक समस्या आहेत. त्यामुळे रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.

जिमलगट्टा आरोग्य केंद्र समस्याग्रस्त
संजय गज्जलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मदार असलेल्या जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्य:स्थितीत अनेक समस्या आहेत. त्यामुळे रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.
जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. उमानूर (सुदागुडम) येथील रणजीत मल्लेश गावडे या तीन वर्षाच्या मुलाला हगणव, उटली, ताप असल्याने त्याला ३ जून रोजी दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. रणजीतची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अहेरी येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र या ठिकाणची एमएच ३३-९३२५ क्रमांकाची रूग्णवाहिका मागील आठ दिवसांपासून ब्रेक फेल असल्याने बंद स्थितीत आढळून आली. राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मरपल्ली उपकेंद्रासाठी देण्यात आलेली रूग्णवाहिका होती. मात्र त्याची चावी मिळत नव्हती. त्याचबरोबर या रूग्णवाहिकेत डिझेल सुध्दा नव्हते.
येंकाबंडा येथील गरोदर माता ज्योती सुनिल सिडाम हिला २ जून रोजी सायंकाळी ७ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तिला झटके येत होत. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिलाही अहेरी येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याही वेळी चावी व डिझेल उपलब्ध नसल्या कारणाने १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बोलवावी लागली. सदर रूग्णवाहिका तब्बल चार तासानंतर रात्री १.३० वाजता जिमलगट्टा येथे पोहोचली. या अगोदर २८ मे रोजी रसपल्ली येथील चंद्रकला प्रभाकर दुर्गे हिला प्रसुतीसाठी जिमलगट्टाच्या दवाखान्यात भरती करायचे होते. मात्र रूग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे दोन दिवसानंतर कुटुंबातील व्यक्तींनीच गरोदर मातेला दवाखान्यात भरती केले. दुसऱ्या दिवशी अहेरी येथे रेफर करण्यात आले. त्याही वेळी १०८ ची रूग्णवाहिका बोलविण्यात आली. मागील १० दिवसांपासून येथील दोन्ही रूग्णवाहिका बंद स्थितीत आहेत. प्रत्येक वेळी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला फोन लावावे लागते. सदर रूग्णवाहिका सुध्दा वेळेवर पोहोचत नाही. परिणामी एखाद्या रूग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. औषधीसाठा सुध्दा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.
वॉटर कुलर बनले शोभेची वस्तू
जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात वॉटर कुलर बसविण्यात आले आहे. मात्र सदर वॉटर कुलर सुध्दा अनेक दिवसांपासून बंद आहे. परिणामी रूग्णांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्राची साफसफाई सुध्दा करण्यात आली नव्हती.
डॉक्टरांच्या अनुपस्थितीतबाबत तालुका आरोग्य अधिकारी इशांत तुटकर यांच्याशी संपर्क केला असता, ३ व ४ जून साठी आवलमारीचे वैद्यकीय अधिकारी दरवडे यांना रूजू केले असल्याचे सांगितले. मात्र ३ जून रोजी एकही डॉक्टर या ठिकाणी उपस्थित नव्हता. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.