दुर्गम गावांत पोहोचला ज्ञानरचनावाद
By Admin | Updated: February 27, 2016 01:40 IST2016-02-27T01:40:50+5:302016-02-27T01:40:50+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ३१ मार्च २०१६ पर्यंत सर्व मुलांना १०० टक्के प्रगत करण्याचे उद्दिष्ट आहे.

दुर्गम गावांत पोहोचला ज्ञानरचनावाद
भामरागड तालुका : प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटी
भामरागड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ३१ मार्च २०१६ पर्यंत सर्व मुलांना १०० टक्के प्रगत करण्याचे उद्दिष्ट आहे. शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता दुर्गम गावांत गटशिक्षणाधिकारी दरडमारे यांच्या वतीने भेटी देऊन ज्ञानरचनावादावर मार्गदर्शन केले जात आहे.
भामरागड तालुक्यातील शाळांंना गटशिक्षणाधिकारी दरडमारे व केंद्रप्रमुख, साधन व्यक्तींच्या माध्यमातून भेटी दिल्या जात आहेत. या अंतर्गत कसनसूर शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळेत १०० टक्के उपस्थिती, ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन, शाळेची बाह्यांग व अंतरंग सजावट, परिसर स्वच्छता, गुणवत्तापूर्ण शिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी साधन व्यक्ती चांगदेव सोरते, केंद्रप्रमुख जोशी उपस्थित होते. संचालन अमोल दुर्याेधन यांनी केले.
तीरकामेटा येथे केंद्रसंमेलन
समूह साधन केंद्र भामरागडद्वारा आयोजित भामरागड केंद्राचे शैक्षणिक केंद्र संमेलन जि. प. शाळा तीरकामेटा येथे नुकतेच पार पडले. केंद्र अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख गुरूदास गोमासे होते. उद्घाटन उपक्रमशील साधन व्यक्ती चांगदेव सोरते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक व विशेषतज्ज्ञ जगने उपस्थित होते. केंद्र संमेलनात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, विद्यार्थी क्षमता व कौशल्याचे विकसन, शाळा बाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्या प्रगतीसाठी विशेष कृती कार्यक्रम, १०० टक्के विद्यार्थी उपस्थिती व १०० टक्के गुणवत्ता, ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन करणे या विषयीचे मार्गदर्शन उपक्रमशील साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी केले. ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धती कशी आहे, याबाबत चर्चा केंद्रप्रमुख गुरूदास गोमासे यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन केंद्रे तर आभार जगने यांनी मानले.