बंदुकीची हिंसा संपतेय, पण शहरी माओवादाचे आव्हान

By संजय तिपाले | Updated: July 22, 2025 16:16 IST2025-07-22T16:15:21+5:302025-07-22T16:16:27+5:30

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता : विदेशातून फंडिंग होत असल्याचा दावा

Gun violence is ending, but urban Maoism remains a challenge | बंदुकीची हिंसा संपतेय, पण शहरी माओवादाचे आव्हान

Gun violence is ending, but urban Maoism remains a challenge

गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोलीचा वेगाने विकास होत आहे, उद्योग येत आहेत, आदिवासी, अठरापगड लोकांचे जीवनमान बदलत आहे, पण काही लोकांच्या डोळ्यांत प्रगती खुपत आहे. जंगलातील बंदुकीची हिंसा संपत असली तरी शहरी माओवादाचे आव्हान निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर मोहीम चालवून गडचिरोलीबाबत दिशाभूल केली जात असून यासाठी विदेशातून फंडिंग होत असल्याचा दावा मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कोनसरी (ता. चामोर्शी) येथे लॉयडस मेटल्स अँड एनर्जी लि. च्या वतीने ४.५ एमटीपीए क्षमतेच्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्प, कोनसरी येथे १०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय, सीबीएसई पद्धतीची शाळेचे भूमिपूजन, सोमनपल्ली येथे  कर्मचारी वसाहतीचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार  परिणय फुके , आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, पद्मश्री तुलसी मुंडा, व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे , माजी जिल्हाध्यक्ष  प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार , पोलिस महानिरीक्षक (अभियान) संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग सुरू करण्यात आला. २०१५ पासून आतापर्यंत कंपनीने हिंमतीने पाऊल ठेवले त्यामुळे आज या भागातील गरीब आदिवासी व अठरापगड जातीच्या लोकांचे आयुष्य बदलत आहे. जल, जंगल, जमीन अबाधित राखून विकास करायचा, इथल्या खनिजावर इथेच प्रक्रिया करून स्वस्त आणि दर्जेदार पोलाद निर्माण करायचे अशी अट घातली होती. रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याचे धोरण आहे. त्यामुळे या भागाचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, गेल्यावेळी पायाभरणी कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर गरीब आदिवासींना मारले, त्यांच्या जमिनी बळकावल्या, त्यांच्यावर अन्याय केला अशा आशयाच्या पोस्ट प्रसारित करून प्रपोगंडा निर्माण करण्यात आला, असे फडणवीस यांनी सांगितले. 
 
लोकांना भ्रमित करणारे दोघे कोलकाता तर दोघे बंगळुरूचे 

जंगलात बोटावर मोजण्याइतके नक्षल शिल्लक आहेत, त्यांनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले, जंगलातील माओवाद संपत असला तरी शहरी नक्षलवादाचे आव्हान निर्माण झाले असल्याचे सांगून त्यांनी चिंता व्यक्त केली. गडचिरोलीत सुरू असलेल्या विकासाबाबत लोकांना भ्रमित करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेतला असता त्यातील दोघे कोलकाता तर दोघे बंगळुरूचे असल्याचे समोर आले. त्यांना विदेशातून फंडिंग होत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. मात्र, लोकशाही राज्यात अशा प्रकारे संविधान विरोधी काम करणाऱ्यांना कुठेही थारा नाही, त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे दुर्दैवी 
विधिमंडळात ऑनलाइन जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पिकविण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. शेतकरी नव्हे शासन भिकारी असल्याच्या कोकाटे यांच्या कथित वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की त्यांचे विधान मी पाहिले नाही, पण ते असे काही बोलले असतील तर ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
 

Web Title: Gun violence is ending, but urban Maoism remains a challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.