Encounter In Gadchiroli : 'ही देशातील मोठी कारवाई, पोलिसांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक करणार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 14:08 IST2021-11-14T13:33:25+5:302021-11-14T14:08:31+5:30
ही गेल्या वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई असून राज्यातीलच नव्हे तर देशासाठीही मोठी बाब आहे. याबाबत, मुख्यमंमत्र्याशी चर्चा करून पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना बक्षिस दिले जाणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Encounter In Gadchiroli : 'ही देशातील मोठी कारवाई, पोलिसांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक करणार'
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात राबण्यात येणाऱ्या अभियानाला आज मोठं यश मिळालं आहे. या चकमकीत २६ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे आणि महेश गोटा मारले गेले आहेत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच कौतुक केलं आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर असलेल्या कोटगुल ग्यारापत्ती जंगलात सी ६० कमांडोंनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. झालेल्या नक्षल आणि पोलिसांच्या चकमकीची माहिती देताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या चकमकीत २६ नक्षली मारले गेले आहेत. तसेच, नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेलाही ठार मारण्यात आले आहे. त्याच्यावर ५० लाखांचे बक्षीस होते. ही गेल्या वर्षभरातली राज्यातीलच नव्हे तर देशातील मोठी कारवाई असून महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठीही मोठी बाब आहे. त्याठिकाणी जावून पोलीस आणि जवानांची भेट घेणार आहेत. यासोबतच, मुख्यमंमत्र्याशी चर्चा करून पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना बक्षिस दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
सुमारे ९ ते १० तास ही चकमक सुरू होती. यामध्ये पोलिसांचे चार जवान जखमी झाले. त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, असंही शिंदे म्हणाले.
आम्हाला गडचिरोलीचा विकास करायचा आहे. त्या भागाचा विकास आम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे. जिल्ह्यात विकासकामेही सुरू झाली आहेत, असं त्यांनी सांगितलं. मला धमकी देणारा यात मारला गेलाय का याचा तपास पोलीस आणि गृहविभाग करीत आहे. अशा धमक्या अनेकवेळा आल्या आहेत. त्याला मी घाबरलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.