तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची दुकानदारांकडून हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:42+5:302021-05-07T04:38:42+5:30

कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण राेखण्यासाठी लाॅकडाऊन आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषणूचा प्रसार होत असल्याची ...

Guarantee from shopkeepers not to sell tobacco products | तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची दुकानदारांकडून हमी

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची दुकानदारांकडून हमी

कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण राेखण्यासाठी लाॅकडाऊन आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषणूचा प्रसार होत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. तरीसुद्धा ग्रामीण भागात किराणा दुकानांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून येते. कायद्याचे होणारे उल्लंघन थांबविण्यासाठी मुक्तिपथ अभियानाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील दुकानदारांपर्यंत पोहाेचण्याचे मुक्तिपथचे लक्ष आहे. त्यानुसार गावातील किराणा दुकानांना मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेचे सदस्य संयुक्तरीत्या भेट देत व्यावसायिकांकडून हमीपत्र भरून घेत आहेत. व्यावसायिक हमीपत्रावर स्वाक्षरी करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाही, अशी ग्वाही देत आहेत. ‘तंबाखूमुळे कोरोना पसरतो व कॅन्सर होतो. या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही,’ अशा आशयाचे हमीपत्र व्यावसायिकांच्या स्वाक्षरीनिशी दुकानासमोर लावण्यात येत आहेत, तसेच तंबाखूयुक्त पदार्थांच्या विक्रीवर शासकीय बंदी आहे. खर्रा, गुडाखू, नस विकणे शासकीय आदेशानुसार गुन्हा आहे, असे तंबाखूचे दुष्परिणाम सांगत जनजागृती करण्यात येत आहे.

Web Title: Guarantee from shopkeepers not to sell tobacco products