जीएसटीमुळे देशातील कर प्रणाली झाली सुलभ
By Admin | Updated: July 9, 2017 02:24 IST2017-07-09T02:24:45+5:302017-07-09T02:24:45+5:30
जीएसटीमुळे (वस्तू व सेवा कर) देशातील सर्वच कर बाद झाले असल्याने कर प्रणाली अत्यंत सुलभ झाली आहे.

जीएसटीमुळे देशातील कर प्रणाली झाली सुलभ
नितीन पालिवाल यांचे प्रतिपादन : जिल्हा बँकेत जीएसटीवर कार्यशाळा; व्यापारी व व्यावसायिकांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जीएसटीमुळे (वस्तू व सेवा कर) देशातील सर्वच कर बाद झाले असल्याने कर प्रणाली अत्यंत सुलभ झाली आहे. देशाच्या प्रगतीला निश्चितच चालना मिळेल, असे प्रतिपादन नितीन पालिवाल यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शनिवारी जीएसटी संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार तर प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखापाल सावंत उपस्थित होते. जीएसटीमुळे देशातील कर प्रणालीत एकसूत्रता निर्माण होण्यास मदत झाली आहे. जीएसटीच्या माध्यमातून राज्यालाही कराच्या ५० टक्के उत्पन्न मिळणार आहे. २० लाखापेक्षा कमी उलाढाल असलेल्यांना जीएसटी रजिस्टर्ड करण्याची गरज नाही. त्यामुळे ते व्यापारी यातून वगळल्या गेले आहेत. व्यापारी वेगवेगळ्या विभागांना रिटर्न फाईल सादर करीत होते. आता त्यांना केवळ एकच फाईल सादर करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे. काही दिवस थोड्या फार अडचणी निर्माण होतील. त्यानंतर मात्र जीएसटीचे फायदे व्यापारी वर्गाच्या लक्षात येतील, असे मार्गदर्शन नितीन पालिवाल यांनी केले. अध्यक्षीय भाषणादरम्यान मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी ११ वर्षांच्या अध्ययनानंतर जीएसटी लागू करण्यात आला आहे. भारतीय कर व्यवस्थेत जीएसटी हा मैलाचा दगड ठरणार आहे. ‘एक देश, एक कर’ हा मुख्य हेतू जीएसटीचा असल्याने उद्योग व्यापाऱ्याला चालना मिळण्यास मदत होईल. जीएसटीचे फायदे लक्षात आल्याने अनेक देशांनी हीच कर प्रणाली अवलंबिली आहे. उशीरा का होईना भारतानेही ही कर प्रणाली अवलंबिली असल्याने अभिमानाची बाब आहे. नवीन पध्दती असल्याने सुरूवातीला थोडाफार त्रास होईल. त्यानंतर मात्र सर्व काही ठिक होईल, असा आशावाद पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक सतीश आयलवार यांनी मानले.