एसटीला पावली दिवाळी; दोन कोटींची केली कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 14:41 IST2024-11-15T14:39:05+5:302024-11-15T14:41:18+5:30
महिलांची संख्या अधिक : गर्दीच्या हंगामाचा एसटीने उचलला फायदा

Great business in Diwali season; ST bus Earned two crores
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : इतरांसाठी रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणारा दिवाळी सण एसटीलाही नाराज करत नाही. त्यामुळे एसटी दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहत राहते. अर्धी तिकीट केल्यापासून तर महिला प्रवाशांचा एसटीकडे अधिकच ओढा वाढला आहे. १ ते १० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत गडचिरोली विभागाने सुमारे २ कोटी १३ लाख ७४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
दिवाळी सणाच्या निमित्ताने बहुतांश बहिणी माहेरी जातात. या कालावधीत शाळांना सुट्या असल्याने मुलेही मामाच्या गावी फिरून येण्यास तयार होतात. याच कालावधीत धान कापणीचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे गावातील बहीण कामात व्यस्त असतात. तरीही वेळात वेळ काढून दिवाळीनंतर आठ दिवसांपैकी एक दिवस त्या हमखास भावाला ओवाळणी घालण्यासाठी माहेरी जातातच. राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात अर्धी तिकीट सुरू केल्यापासून एसटीत महिला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दिवाळीत तर या गर्दीने उच्चांक गाठला होता. बहुतांश बसेस फुल्ल भरून जात होत्या. या कालावधीत गडचिरोली विभागातील एसटीने सुमारे २ कोटी १३ लाख रुपये कमावले आहेत.
साडेसहा लाख किमी प्रवास
- १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत एसटी बसगाड्या सुमारे ६ लाख ४० हजार किमी धावल्या आहेत. या कालावधीत लांब पल्ल्याच्या बसेसही सोडण्यात आल्या होत्या. चंद्रपूर व नागपूर हे दोन मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. या कालावधीत शाळांना सुट्या असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी वापरता आल्या. त्याचा फायदा एसटीला झाला आहे.
- गडचिरोली विभागांतर्गत अहेरी, गडचिरोली व ब्रह्मपुरी या तीन विभागांचा समावेश होतो. या कालावधीत तीनही आगारांतील एसटी बसगाड्यांनी सुमारे ५ लाख ३२ हजार ५९२ प्रवाशांची वाहतूक केली.
"दिवाळी कालावधीत प्रवाशांची संख्या वाढली होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीने नियोजन केले होते. ज्या मार्गावर प्रवासी अधिक आहेत. त्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या. एसटी कर्मचारी व अधिकारी यांनीही दिवाळीच्या कालावधीत मन लावून काम केले. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळाले आहे."
- अशोक वाडीभस्मे, विभाग नियंत्रक, गडचिरोली