कोरेपल्लीत ४५ गावांची ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:57 IST2019-01-31T22:57:05+5:302019-01-31T22:57:19+5:30
अहेरी तालुक्यातील ४५ गावांची संयुक्त ग्रामसभा कोरेपल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत गावांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.

कोरेपल्लीत ४५ गावांची ग्रामसभा
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : अहेरी तालुक्यातील ४५ गावांची संयुक्त ग्रामसभा कोरेपल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत गावांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.
सभेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अॅड.लालसू नोगोटी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, माजी सरपंच सांभय्या करपेत, कैलास कोरेत, राजारामचे सरपंच विनायक आलाम, माजी सरपंच भगवान मडावी, वेडमपल्लीचे उपसरपंच मांता पोरतेट, माजी सरपंच सदू पेंदाम, अहेरी तालुका ग्रामसभा प्रतिनिधी तिरूपती कुळमेथे, सतीश सडमेक, बाजीराव तलांडी, शंकर नैताम, जितू गड्डमवार, नारायण चालुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट म्हणाले, भारतीय संविधानात आदिवासाींकरिता विविध घटनात्मक तरतूदी आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास करण्यासाठी पेसा कायदा, वनाधिकार कायदा यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आदिवासी बांधवांनी अन्यायाच्या प्रतिकारासाठी संघटित व्हावे, असे मार्गदर्शन केले.
अॅड.लालसू नोगोटी यांनी भारतीय घटनेतील सातव्या अनुसूचीनुसार अभ्यासक्रमात गोंडी भाषेचा समावेश करावा, वनविभागाने पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. सांभय्या करपेत यांनी गोंडी धर्म संस्कृतीविषयी मार्गदर्शन केले. कैलास कोरेत यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
संचालन सरपंच बालाजी गावडे, प्रास्ताविक कमलापूरचे उपसरपंच शंकर आत्राम तर आभार भूमक भगवान मडावी यांनी मानले. यावेळी गाव विकास व विविध योजनांबाबत चर्चा झाली.