शासनाचे घरकूल मिळाल्याने ‘तो’ झाला कर्जबाजारी
By Admin | Updated: December 4, 2014 23:08 IST2014-12-04T23:08:30+5:302014-12-04T23:08:30+5:30
एक छोटे घरकूल असावे छान, अशी सर्वांची अपेक्षा असते. श्रीमंत माणसापासून ते गरीब माणसापर्यंत सर्वचजण हे स्वप्न उराशी घेऊन आपली जीवनभर धावपळ चालू ठेवतात व घरकूल होण्याचा क्षण जवळ आला की,

शासनाचे घरकूल मिळाल्याने ‘तो’ झाला कर्जबाजारी
संजय गज्जलवार - जिमलगट्टा
एक छोटे घरकूल असावे छान, अशी सर्वांची अपेक्षा असते. श्रीमंत माणसापासून ते गरीब माणसापर्यंत सर्वचजण हे स्वप्न उराशी घेऊन आपली जीवनभर धावपळ चालू ठेवतात व घरकूल होण्याचा क्षण जवळ आला की, आनंदाला पारावार उरत नाही, अशी सर्वांचीच स्थिती होते. हे घरकूल पूर्ण करण्यासाठी मिळेल तेथून पैसा जमा करून ते साकारण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र कधीकधी हे घरकूल शासनाकडूनही मंजूर झाले म्हणजे, फार काही आर्थिक बोझा उरावर येत नाही, ही अपेक्षा असते व आपल्याला सहजतेने घर मिळाले या आनंदाने अनेकांना पारावरही उरत नाही. मात्र सरकारच्या घरकुलाने कर्जबाजारी होऊन आता लोकांसमोर हात पसरविण्याची वेळ यावी अशी स्थिती अहेरी तालुक्याच्या पत्तीगाव गावात एका लाभार्थ्यावर आली आहे.
घरकूलासाठी जवळ जमा असलेले पैसे लावून दिल्यानंतरही शासनाचे अनुदान मागील दोन वर्षांपासून आलेले नाही. त्यामुळे कर्जबाजारीत स्थिती कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता या लाभार्थ्याला कठीण होऊन गेले आहे. जिमलगट्टा हे अहेरी तालुक्यातील मोठे गाव. जिमलगट्टापासून १० किमी अंतरावर पत्तीगाव आहे. येथील अडमा सांबा गावडे या लाभार्थ्याला सन २०१२ मध्ये घरकूल मंजूर झाले. अडमा यांनी शासनाकडून घरकूल मंजूर झाले म्हणून बांधकामाला जोमाने सुरूवात केली. संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शासनाकडून बांधकामासाठीचा पहिला हप्ताही मिळाला व त्यांनी परत बांधकामाला वेगाने सुरूवात केली. गतवर्षीपर्यंत त्यांनी दरवाजाच्यास्तरापर्यंत म्हणजे ७ फूटापर्यंत बांधकाम पूर्ण केले. सदर बांधकाम करण्यासाठी त्यांनी सिमेंट, सळाखी व इतर साहित्य हे उधारीत नजीकच्या दुकानदाराकडून आणले. आपल्या घरकुलाचे दुसऱ्या टप्प्यातले बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी ग्रामसेवकांना तसेच पंचायत समितीलाही स्वत: जाऊन दिली. मात्र दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचे पैसे मागील दोन वर्षांपासून त्यांना मिळालेले नाही. ग्रामसेवकाकडेही त्यांनी यासंदर्भात तक्रार केली. परंतु अजून त्यांचे बिलच टाकण्यात आलेले नाही, अशी माहिती मिळाली आहे. स्वत: कर्जबाजारी होऊन हे घरकूल उभे करताना त्यांनी पोटाला मोठी पिळ दिली. परंतु शासनाकडून अनुदान आले नाही. अखेरीच त्यांना पुढचे काम थांबवावे लागले. आता कुटुंब कसे चालवायचे, अर्धवट बांधकाम झालेल्या घरात राहायचे कसे असे अनेक प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर निर्माण झाले आहे व अडमा आता द्विधा मनस्थितीत पोहोचले असून शासनाच्या घरकुलाने आपल्याला कर्जबाजारी केले, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.