तेंदुपत्ता लिलावाला यावर्षी चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:46+5:302021-03-15T04:32:46+5:30
एटापल्ली : पेसा अंतर्गत यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगाम लिलावाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील जाभींया गावात झालेल्या पहिल्याच तेंदू लिलावाला ...

तेंदुपत्ता लिलावाला यावर्षी चांगला प्रतिसाद
एटापल्ली : पेसा अंतर्गत यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगाम लिलावाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील जाभींया गावात झालेल्या पहिल्याच तेंदू लिलावाला महाराष्ट्रासह, तेलंगाना, आंध्रप्रदेश येथील आठ ते दहा कंत्राटदारांनी उपस्थित राहात बोली लावली. नऊ हजार रूपये प्रतिगाेणी (एक हजार पुडा) देण्याची शेवटची बाेली लावण्यात आली. मात्र, ग्रामसभेने १५ हजार रूपये प्रतिगाेणी भाव ठेवला आहे. त्यामुळे लिलावाची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तरीही यावर्षी चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.
जाबींया गावात गट्टा परिसरातील आठ ग्रामपंचायतींमधील ७० गावांकरिता तेंदू लिलाव ठेवण्यात आला हाेता. या लिलावात ग्रामसभेचे पदाधिकारी सैनू गोटा, लक्ष्मन नवडी व प्रत्येक गावातील ग्रामसभेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही गावांमधील तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे तर काही गावांमधील तेंदूपत्ता मध्यम दर्जाचा आहे. यापूर्वी प्रत्येक गावानुसार लिलाव ठेवला जात हाेता. त्यामुळे प्रत्येक गावाला वेगवेगळा दर मिळत हाेता. आता मात्र ७० गावांमधील तेंदूपत्त्यासाठी एकच दर ठरवावा लागणार आहे. त्यामुळे नेमका किती दर द्यावा, याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम हाेता.
ग्रामसभेने प्रतिशेकडा १५ हजार रूपये प्रतिगाेणी अपेक्षित भाव निश्चित केला आहे. मात्र, पहिल्या लिलावात व्यापाऱ्यांनी ९ हजार रूपये प्रतिगाेणीपर्यंत बाेली लावली. हा भाव मागील दाेन वर्षांपेक्षा अधिक आहे. मात्र, एवढ्या भावात तेंदूपत्ता न देण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. आता दुसरा व तिसरा लिलाव ठेवण्यात आला असून, या लिलावांमध्ये अधिक भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
राेख रकमेची अडचण
तेंदूपत्ता मजूर मजुरीची रक्कम राेख मागतात. पाेलीस विभाग मात्र राेख रक्कम आणू देत नाही. तसेच रक्कम सापडल्यास चाैकशीचा ससेमिरा लावला जातो व याचा मोठा त्रास कंत्राटदाराला सहन करावा लागतो, असा मुद्दा कंत्राटदारांनी उपस्थित केला. मात्र, त्यावर ताेडगा निघू शकला नाही.