तेंदूपत्त्याला ३५० रूपये भाव द्या
By Admin | Updated: May 18, 2015 01:47 IST2015-05-18T01:47:03+5:302015-05-18T01:47:03+5:30
चालू तेंदूपत्ता हंगामात प्रती शेकडा ३५० रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी धानोरा तालुका विकास कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

तेंदूपत्त्याला ३५० रूपये भाव द्या
धानोरा : चालू तेंदूपत्ता हंगामात प्रती शेकडा ३५० रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी धानोरा तालुका विकास कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या समितीच्या सदस्यांची बैठक शुक्रवारी दंतेश्वरी देवस्थानाजवळ पार पडली. यावेळी ही मागणी करण्यात आली. तेंदूपत्त्याचे पुडे घेणाऱ्या मुन्शी व शिपायाला आठ हजार मानधन, पुड्याची पलटाई करण्यासाठी जागेचा कर व पाणी कर म्हणून दोन हजार ५०० रूपये देण्यात यावा, बोदाची वाहतूक प्रती बोद ४५ रूपये प्रमाणे करण्यात यावी, तेंदूपत्ता संकलन करताना एखाद्या मजुराचा मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रूपये व अपंगत्व आल्यास एक लाख रूपये मदत देण्यात यावी, ग्रामसभा व ग्राम पंचायतीला प्रती बोद दहा रूपये देण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदाराला गावाच्या परिसरात तेंदूपत्ता संकलन करू दिले जाणार नाही, असा इशाराही दिला.
बैठकीला सोडेचे सरपंच चंद्रशेखर किरंगे, समाजसेवक देवाजी तोफा, बावजी उसेंडी, माधव गोटा, बारगाये, उसेंडी, बंडू किरंगे, हनुमंत नरोटे, वासुदेव कुमोटी, जीवन नरोटे आदींसह ५० गावांमधील प्रतिनिधी व कंत्राटदार उपस्थित होते.
तेंदूपत्त्याच्या माध्यमातून तेंदूपत्ता कंत्राटदार लाखो रूपये कमावून नेतात. गैरसोय मात्र गावातील नागरिकांना सहन करावी लागते. वाढीव भाव दिल्यास कंत्राटदारांना फार मोठे नुकसान सोसावे लागणार नाही. परिणामी वाढीव भाव देण्याची मागणी सभेदरम्यान करण्यात आली. सभेला पोलीस निरीक्षक ढवळेही उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)