टिपागडला अभयारण्याचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:55+5:302021-05-12T04:37:55+5:30

काेरची : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची ...

Give sanctuary status to Tipagad | टिपागडला अभयारण्याचा दर्जा द्या

टिपागडला अभयारण्याचा दर्जा द्या

काेरची : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे़ शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु याकडे दुर्लक्ष आहे.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

कचराकुंड्यांची संख्या वाढविण्याची मागणी

आरमोरी : शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून, प्रशासनाचे या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे़ शहरातील अनेक अंतर्गत भागात नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत़ तेथे कुंड्या नव्याने ठेवण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.

भूखंड देण्याची मागणी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्यरेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

रांगी मार्गावर झुडपे

आरमोरी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वन विभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते.

वीज तारांना रेटून बांधकाम

देसाईगंज : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत तारांच्या अगदी जवळून इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याकडे नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष होत चालले आहे. अशा इमारतींमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

थ्री-जी सेवा नावापुरतीच

कुरूड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.

शाैचालयांची दुरवस्था

आष्टी : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. सदर शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. शौचालयांची स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

जनावरांमुळे रहदारीस बाधित

एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारीस बाधित होत असून वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.

पाणंद रस्ते अतिक्रमणात

ठाणेगाव : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पाणंद रस्ते म्हटले जाते. या पाणंद रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. वनखी व चामोर्शी माल येथील पाणंद रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा येत आहे.

लघु सिंचन इमारत जीर्ण

अहेरी : उपविभागातील सहा तालुक्यांचा कारभार पाहणारे अहेरी येथील उपविभागीय लघु सिंचन जलसंधारण कार्यालयाला शासनाने इमारत बांधून दिली नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीतूनच चालविला जात आहे. याशिवाय अनेक कार्यालये दुसऱ्या इमारतींमधून चालविली जात आहेत.

पथदिवे झाकाेळले

आष्टी : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्यात, अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.

निवासस्थाने निरूपयाेगी

आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. येथील अनेक वन कर्मचाऱ्यांच्या इमारती ओसाड दिसून येतात.

मालेवाडा भागात समस्या

कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. आरोग्य सेवा सुधारण्याची मागणी आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.

भाकरोंडीत रस्ते खड्डेमय

भाकरोंडी : परिसरातील अनेक गावांतील रस्त्यांचे २० वर्षांपूर्वी बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले. परंतु सदर मार्गाची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आवागमन करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे.

चातगावात कव्हरेज खंडित

धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. येथील बिघाडाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

धोडराज मार्गावर खड्डे

भामरागड : भामरागडावरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली आहे. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मागील वर्षी या मार्गाच्या दुरवस्थेत आणखी भर पडली.

Web Title: Give sanctuary status to Tipagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.