अंतिम मंजुरी मिळण्याआधीच वैरागड घाटावर रेतीचा उपसा
By Admin | Updated: January 17, 2015 01:38 IST2015-01-17T01:38:14+5:302015-01-17T01:38:14+5:30
खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभागाच्या चमूमार्फत सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील काही रेतीघाटांची..

अंतिम मंजुरी मिळण्याआधीच वैरागड घाटावर रेतीचा उपसा
वैरागड : खनिकर्म विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभागाच्या चमूमार्फत सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील काही रेतीघाटांची ई-निविदा व ई-आॅक्शन प्रक्रिया राबवून रेतीघाटांचे लिलाव करण्यात आले. त्यात आरमोरी तालुक्यातील वैरागड एक व वैरागड दोन या रेतीघाटांचा समावेश आहे. ई-निविदा व ई-आॅक्शन प्रक्रियेतून लिलाव झालेल्या रेतीघाटाला जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर व खनिकर्म विभागाच्या आदेशानंतर संबंधीत कंत्राटदारांनी नियमानुसार रेतीघाटातून उपसा करायचा असताना एक कंत्राटदार अंतिम मंजुरी मिळण्याअगोदरच रेतीचा उपसा करीत असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे.
वैरागड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाटणवाडा येथे समाज मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी रेतीचा अवैध उपसा करून समाजमंदिर बांधकाम धडाक्यात सुरू आहे. या बांधकामासाठी रेतीचा अवैध उपसा करण्याकरिता महसूल विभागाचे अभय आहे. ज्या रेतीतस्करांवर कारवाई झाली, त्यांनाच पुन्हा रेतीघाटाचे कंत्राट देण्यात आले आहे. अवैध रेती उपसा होत असल्याबद्दल वैरागड येथील मंडल महसूल अधिकाऱ्यास विचारणा केली असता, रात्रीच्यावेळी रेतीची अवैध वाहतूक होते. त्याला आम्ही काय करणार, असे त्यांचे म्हणणे आहे. एखाद्यावेळी गरजू लोकांनी बैलबंडीने रेतीची वाहतूक केली तर त्यांच्यावर कारवाई होते. ट्रॅक्टरद्वारे रेतीची तस्करी होत असताना महसूल विभाग झोपेचे सोंग घेऊन आहे. आरमोरी तालुक्यातील मोहझरी, डोंगरतमाशी, मेंढा (वडेगाव) घाटावरून देखील मागील अनेक दिवसांपासून रेतीचा अवैध उपसा होत आहे. वैरागड घाटाची अवैध रेती वाहतूक परिसरातील वडधा, चामोर्शी, वासाळा, डोंगरगाव या ठिकाणी होत आहे. परंतु याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. (वार्ताहर)