गडचिरोलीच्या आठवडी बाजाराचे रूप पालटणार

By Admin | Updated: June 23, 2016 01:11 IST2016-06-23T01:11:50+5:302016-06-23T01:11:50+5:30

स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने येथील हनुमान वॉर्डालगतच्या आठवडी बाजारात विक्रेत्यांसाठी ओटे,

Gadchiroli's weekly market will change | गडचिरोलीच्या आठवडी बाजाराचे रूप पालटणार

गडचिरोलीच्या आठवडी बाजाराचे रूप पालटणार

तीन कोटींच्या कामास पालिकेची मंजुरी : नगराध्यक्ष, नगरसेवक, नगररचनाकार व अभियंत्यांनी केली जागेची पाहणी
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने येथील हनुमान वॉर्डालगतच्या आठवडी बाजारात विक्रेत्यांसाठी ओटे, शेड तयार करण्यात येणार असून बाजाराच्या संपूर्ण जागेवर सिमेंट काँक्रीटचे फ्लोरिंग करण्यात येणार आहे. याशिवाय भाजी व मटन बाजार स्वतंत्र करण्यात येणार आहे. या विकासात्मक कामाचे ३ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्याला पालिकेने मंजुरी प्रदान केली आहे. पालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधी योजनेतून आता गडचिरोलीच्या आठवडी बाजाराचे रूप पालटणार आहे. त्या दृष्टीने पालिका प्रशासनाने हालचाली वाढविल्या आहेत.
रविवारी भरणाऱ्या येथील आठवडी बाजारात गडचिरोली तालुक्यासह अनेक भागातील नागरिक खरेदी व विक्रीसाठी येतात. जिल्हा मुख्यालयी आठवडी बाजार असूनही सोयीसुविधांअभावी विक्रेते व ग्राहकांची मोठी गैरसोय होते. पावसाळ्यात या आठवडी बाजारात चिखलाचे साम्राज्य राहत असल्याने येथील नागरिकांना अक्षरश: चिखल तुडवत भाजीपाला खरेदी करावा लागतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पुढाकार घेतला. पालिकेचे तत्कालीन बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार यांनीही आठवडी बाजारातील सोयीसुविधांसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यानंतर पालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आठवडी बाजारात आवश्यक त्या सोयीसुविधा करण्यास मंजुरी प्रदान केली. शनिवारी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी आठवडी बाजारात जाऊन जागा व तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी नगरसेवक संजय मेश्राम, सभापती बेबी चिचघरे, नगरविकास विभागाचे नगररचनाकार बारई व न. प. अभियंता संदीप पुनवटकर तसेच बाजारातील अनेक विक्रेते व ग्राहक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

दैनिक गुजरी भरणार आता आठवडी बाजारात
४आठवडी बाजार परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने पाऊल हाती घेतले आहे. या ठिकाणी ओटे, शेड, सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून भाजीपाला व मटन मार्केट स्वतंत्र करण्यात येणार आहे. दैनिक गुजरी बाजारही याच आठवडी बाजाराच्या जागेत भरविण्यासंदर्भात न. प. ने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
४गुजरी बाजार आठवडी बाजाराच्या जागेत हलविण्यात येणार आहे. या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार असून न. प. कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या जागेत सुलभ शौचालयाचे काम सुरू झाले असून येथे वाहन पार्र्किं गची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आठवडी बाजारात सोयीसुविधा करण्यासाठी तीन कोटींच्या विकास कामाचा प्रस्ताव वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तयार करण्यात आला असून याला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पालिकेकडे निधी उपलब्ध आहे. भाजीपाला, मटन मार्केट स्वतंत्र करण्याचे नियोजन आहे. सदर काम पूर्णत्वास आणण्यासाठी नगर विकास विभाग व जिल्हा प्रशासनाकडे आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. अश्विनी धात्रक, नगराध्यक्ष, गडचिरोली

Web Title: Gadchiroli's weekly market will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.