'यू-डायस प्लस'मध्ये गडचिरोलीचा राज्यात डंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:53 IST2024-10-28T14:52:28+5:302024-10-28T14:53:20+5:30
Gadchiroli : १,९९० शाळांची माहिती १०० टक्के ऑनलाइन

Gadchiroli's sting in the state in 'U-Dice Plus'
दिलीप दहेलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारत सरकार यू-डायस प्लसच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांकडून माहिती प्राप्त करून घेत असते. प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टल तसेच टीचर पोर्टल आणि स्टुडंट पोर्टल या तीन पोर्टलमध्ये जिल्ह्यातील एकूण १,९९० शाळांची माहिती १०० टक्के ऑनलाइन भरण्यात आली असून, यू-डायस प्लसच्या तीनही पोर्टलमध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे.
यू-डायस प्लस हे भारत सरकारचे पोर्टल आहे. देशातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे शैक्षणिक मूल्यांकन करणे आणि त्याचबरोबर राज्याचे शैक्षणिक निर्देशांक ठरवणे, समग्र शिक्षा अंतर्गत विविध योजनांचा समावेश समावेश करणे आणि त्या योजना राबविणे, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक देणे, गणवेश देणे, त्याचबरोबर शाळांना अनुदान देणे, तसेच शाळांमध्ये वेगवेगळ्या भौतिक सुविधा प्रदान करणे, आयसीटी लॅब देणे या सर्व बाबींसाठी भारत सरकार यू-डायस प्लसच्या माध्यमातून शाळांची माहिती ऑनलाइन पद्धतीने संकलित केली जाते.
सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांकडून माहिती प्राप्त करून घेत असते. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे पोर्टल सुरू आहे आणि या पोर्टलमध्ये प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टल, तसेच टीचर पोर्टल आणि स्टुडंट पोर्टल या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांची माहिती ऑनलाइन संकलित करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये गडचिरोली जिल्हा सद्यःस्थितीमध्ये टॉपवर असून सर्वत्र कौतुक होत आहे.
अपार आयडी तयार करून घ्यावी
जि. प. शिक्षण विभागाच्यावतीने सध्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करण्याचे काम सुरू आहे. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, तालुकास्तरीय यंत्रणेने तातडीने अपार आयडी तयार करून घ्यावे. तसेच काही अडचण असेल तर जिल्हा संगणक प्रोग्रामरशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्रा.) बाबासाहेब पवार व शिक्षणाधिकारी (मा.) वासुदेव भुसे यांनी केले आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश
शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, एम. आय. एस. कॉर्डिनेटर आणि गट साधन केंद्रातील साधन व्यक्ती या सर्वांनी अत्यंत मेहनतीने हे काम पूर्ण केलेले आहे. सर्वाच्या प्रयत्नामुळे आज गडचिरोलीसारखा अतिदुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त, दळणवळणाच्या सोयी नसलेल्या जिल्ह्याने संपूर्ण राज्यामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. निश्चितच ही कौतुकाची बाब आहे.