जवानाचा बळी घेणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांना अटक, माजी सभापतींच्या हत्येतही सहभाग

By संजय तिपाले | Updated: March 5, 2025 19:42 IST2025-03-05T19:42:32+5:302025-03-05T19:42:56+5:30

Gadchiroli News: भामरागड तालुक्यातील कियेर गावात माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांच्या हत्या प्रकरणासह दिरंगी- फुलनार जंगलात चकमकीत सी- ६० जवान महेश नागुलवार या जवानाचा बळी घेताना झालेल्या चकमकीत सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना पोलिसांनी आरेवाडा जंगलात अटक केली.

Gadchiroli: Two Maoists arrested for killing a jawan, also involved in the killing of former Speaker | जवानाचा बळी घेणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांना अटक, माजी सभापतींच्या हत्येतही सहभाग

जवानाचा बळी घेणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांना अटक, माजी सभापतींच्या हत्येतही सहभाग

- संजय तिपाले
गडचिरोली - भामरागड तालुक्यातील कियेर गावात माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांच्या हत्या प्रकरणासह दिरंगी- फुलनार जंगलात चकमकीत सी- ६० जवान महेश नागुलवार या जवानाचा बळी घेताना झालेल्या चकमकीत सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना पोलिसांनी आरेवाडा जंगलात अटक केली. ५ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली.

कंपनी क्र. १० चा प्लाटून पार्टी कमिटी मेंबर केलू पांडू मडकाम उर्फ दोळवा (२६,रा. मुरकुम ता. उसूर जि. बिजापूर, छत्तीसगड) व भामरागड दलमची सदस्य रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी (३२,रा. मेंढरी ता. एटापल्ली ) अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांवर शासनाचे ८ लाखांचे बक्षीस होते. छत्तीसगड सीमेवरील कियेर येथे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी (४७) यांची १ फेब्रुवारीला गळा दाबून हत्या करत माओवाद्यांनी त्यांच्या मृतदेहावर पत्रक सोडले होते. दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी दिरंगी- फुलनार जंगलात पोलिस व माओवाद्यांत चकमक झाली होती. यात महेश नागुलवार या जवानाने माओवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या दोन्ही प्रकरणांत या दोघांचा सक्रिय सहभाग होता. भामरागड तालुक्यातीलल आरेवाडा जंगल परिसरामध्ये ते दोघे फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिस पथक व सीआरपीएफच्या ३७ बटालियनचे जवान यांनी संयुक्त मोहीम राबवून त्यांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले.

विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव दलाचे २७ बटालियनचे कमांडंट दाओ इंजिरकान कींडो, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, उपअधीक्षक विशाल नागरगोजे व अमर मोहिते यांच्या मागर्दशनाखाली ही कारवाई केली.

गुन्हे कारकीर्द अशी
केलू पांडू उर्फ दोळवा हा २०१६ पासून माओवादी चळवळीत आहे. पामेड दलममधून त्याने सदस्य म्हणून भरती होत कारकीर्दीला सुरुवात केली. छत्तीसगड सीमेवरील चकमकीत त्याचा सक्रिय सहभाग होता. चकमकीचे ४ तर जाळपोळ व खुनाच्या दोन गुन्ह्यांत तो सामील होता.

रमा दोहे उर्फ डुम्मी ही २०११ मध्ये चेतना नाट्यमंचशी जोडली गेली व २०१३ ते २०२३ या दरम्यान गट्टा दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. सध्या ती भामरागड दलममध्ये काम करायची. ८ चकमकी, ६ खुनांत सहभागी असल्याचा तिच्यावर आरोप आहे. 
 

Web Title: Gadchiroli: Two Maoists arrested for killing a jawan, also involved in the killing of former Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.