जहाल माओवादी 'कांताक्का', 'वारलू'चे आत्मसमर्पण, दोघांवर १८ लाखांचे होते बक्षीस

By संजय तिपाले | Updated: February 27, 2025 20:43 IST2025-02-27T20:42:32+5:302025-02-27T20:43:19+5:30

Gadchiroli Naxal News: तब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत  जहाल महिला माओवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (३०) या दोघांनी २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.

Gadchiroli: Surrender of Jahal Maoist 'Kantakka', 'Warlu', 18 lakh reward on both | जहाल माओवादी 'कांताक्का', 'वारलू'चे आत्मसमर्पण, दोघांवर १८ लाखांचे होते बक्षीस

जहाल माओवादी 'कांताक्का', 'वारलू'चे आत्मसमर्पण, दोघांवर १८ लाखांचे होते बक्षीस

- संजय तिपाले 
गडचिरोली - तब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत  जहाल महिला माओवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (३०) या दोघांनी २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. कांतक्कावर १६ तर सुरेशवर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते, पुनर्वसनानंतर आता त्यांना अनुक्रमे साडेआठ लाख व साडेचार लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. ११ गुन्हे नोंद आहेत कांतक्कावर, तर सुरेश वारलु याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.

कांता ऊर्फ कांतक्का ही ( रा. गुडंजुर (रिट) ता. भामरागड) येथील  व  सुरेश ऊर्फ वारलु हा ( रा. मिळदापल्ली ता. भामरागड) या गावचा रहिवासी आहे. कांताक्का ही विभागीय समिती सदस्य (पुरवठा टीम) तर सुरेश वारलु हा भामरागड दलममध्ये सदस्य पदावर काम करत असे. कांताक्का हिने १९९३ मध्ये  मद्देड दलममध्ये भरती होऊन नक्षल चळवळीचा प्रवास सुरु केला. १९९८ पर्यंत ती उत्तर गडचिरोलीतील प्लाटून क्र. २ मध्ये सदस्य होती. पुढे तिची भामरागड दलममध्ये बदली झाली. २००१ मध्ये तिला उपकमांडर पदी पदोन्नती मिळाली. नंतर चातगाव दलममध्ये तिने काम केले. २००६ मध्ये तिने क्षेत्रीय समिती सदस्य म्हणून पदोन्नती मिळवली. २००८ पासून ती विभागीय समिती सदस्य म्हणून  टिपागड, चातगाव व कसनसूर दलममध्ये केएमएस (क्रांतिकारी महिला संघटन) संघटनेमध्ये २०१५ पर्यंत तिने काम केले. २०१५मध्ये तिची माड एरियातील पुरवठा टीममध्ये बदली झाली.  

सुरेश होता राजू वेलादीचा अंगरक्षक
 सुरेश ऊर्फ वारलु मज्जी हा २०२१ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. सप्टेंबर २०२४ पर्यंत त्याने काम केले. २०२४ मध्ये त्याची विभागीय समिती सदस्य राजू वेलादी उर्फ कलमसाय (भामरागड दलम) याचा अंगरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
 

दोन महिन्यांत २२ जणांचे आत्मसमर्पण
चालू वर्षी दोन महिन्यांत आतापर्यंत २२ माओवाद्यांनी गुन्हे प्रवासाला पूर्णविराम देत आत्मसमर्पण करुन सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात केली आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान)  अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव दलाच्या १९२ बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झाले.
 

Web Title: Gadchiroli: Surrender of Jahal Maoist 'Kantakka', 'Warlu', 18 lakh reward on both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.