Gadchiroli: तेलंगणात तस्करीचा बेत फसला; पावणेतीन घनमीटर सागवान जप्त, गस्ती पथकाची कारवाई
By गेापाल लाजुरकर | Updated: October 1, 2024 20:45 IST2024-10-01T20:44:39+5:302024-10-01T20:45:01+5:30
Gadchiroli News:

Gadchiroli: तेलंगणात तस्करीचा बेत फसला; पावणेतीन घनमीटर सागवान जप्त, गस्ती पथकाची कारवाई
- गाेपाल लाजूरकर
गडचिराेली - सिराेंचा तालुक्याच्या पर्सेवाडा उपक्षेत्रातून प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणा राज्यात तस्करीसाठी सागवान माल लपवून ठेवण्यात आलेला हाेता. सदर सागवान लपवून ठेवल्याची गाेपनीय माहिती बामणी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कळली. या माहितीवरून गस्ती पथकाने साेमवार, ३० सप्टेंबर राेजी रात्री धाड मारून २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सागवान लठ्ठे जप्त केले.
सिराेंचा तालुक्याच्या बामणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात सागवानाची तस्करी केली जात आहे. यामुळे वन विभाग सतर्क झालेला आहे. यानुसार पर्सेवाडा उपक्षेत्रात येणाऱ्या लंकाचेन गावाला लागूनच असलेल्या प्राणहिता नदीपात्रात सागवान लठ्ठे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. या गाेपनीय माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी बामणी प्रफुल्ल झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्सेवाडा, टेकडा, बेज्जूरपल्ली उपक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी प्राणहिता नदीकाठावर अज्ञात तस्करांनी तेलंगणा राज्यात वाहतूक करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेले एकूण ३६ नग लठ्ठे जप्त केले. २.७६९ घनमीटर एवढा हा माल आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत २ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी प्रफुल्ल झाडे यांच्या मार्गदर्शनात गस्ती पथकाने केली.
नदीमार्गे रात्री तस्करी
बामणी, पर्सेवाडा, काेटापल्ली परिसरात प्राणहिता नदीमार्गे पाण्यातून सागवानाची तस्करी केली जाते. नदी पाण्याने भरून असतानाही सागवानाच्या माेठमाेठ्या लठ्ठ्यांचा तराफा बांधून बांधून सागवानाची तस्करी तेलंगणा राज्यात हाेते. रात्रीच्या सुमारास हा अवैध प्रकार चालत असल्याने वन विभागाने विशेष पथक नेमून कारवाई करण्याची गरज आहे.