Gadchiroli: दम्यावरील औषध घेण्यासाठी उसळली ५० हजारांवर रुण्गांची गर्दी, मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंजात वितरण
By दिगांबर जवादे | Updated: June 8, 2023 21:10 IST2023-06-08T21:09:45+5:302023-06-08T21:10:17+5:30
Gadchiroli: मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंज येथे ८ जुन राेजी सांयकाळी ६ वाजेपासून दमा औषधीचे वितरण करण्यास सुरूवात झाली. ही औषधी घेण्यासाठी देशभरातील रूग्णांचे जत्थे ७ जुनपासूनच देसाईगंज येथे दाखल झाले.

Gadchiroli: दम्यावरील औषध घेण्यासाठी उसळली ५० हजारांवर रुण्गांची गर्दी, मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंजात वितरण
- दिगांबर जवादे
गडचिराेली - मृग नक्षत्राच्या पर्वावर देसाईगंज येथे ८ जुन राेजी सांयकाळी ६ वाजेपासून दमा औषधीचे वितरण करण्यास सुरूवात झाली. ही औषधी घेण्यासाठी देशभरातील रूग्णांचे जत्थे ७ जुनपासूनच देसाईगंज येथे दाखल झाले. आपला नंबर लवकर लागावा यासाठी रूग्ण दुपारी ४ वाजेपासूनच रांगेत लागले. देशभरातून आलेल्या ५० हजार रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीने आदर्श इंग्लिश हायस्कुलचा प्रांगण फूलून गेला.
असाध्य अशा दमा आजाराची आयुर्वेदिक औषधी मागील ३९ वर्षांपासून वैद्यराज प्रल्हाद कावळे हे निशुल्क देत आहेत. या औषधीने अनेकांचा दमा आजार बरा झाला आहे. त्यामुळे ही औषधी घेण्यासाठी दरवर्षी रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यापूर्वी ही औषधी देसाईगंज तालुक्यातील काेकडी या गावात दिली जात हाेती. मात्र या ठिकाणी सुविधांअभावी रूग्णांची व त्यांच्यासाेबत आलेल्या नातेवाईकांची गैरसाेय हाेत हाेती. त्यामुळे यावर्षी दमा औषधीचे वितरण देसाईगंज येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी या औषधीचे वितरण वर्षातून एकदाच मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी केले जाते. त्यानुसार यावर्षी ८ जून राेजी वितरण करण्यात येत आहे. ८ जून राेजी सायंकाळी ६ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत औषधीचे वितरण केले जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षानंतर औषध वितरण केले जात आहे.
औषध वितरणाच्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटाेले, आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष माेतीलाल कुकरेजा, नागरी बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश पाेरेड्डीवार, माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी, डाॅ. नितीन कोडवते, माजी सभापती परसराम टिकले, उपसभापती गोपाल उईके, माजी जिल्हा परिषद सदस्य रोशनी पारधी, माजी पंचायत समिती उपसभापती अर्चना ढोरे, मुख्याध्यापक दामाेधर सिंगाडे आदी उपस्थित हाेते.
थंड पाणी व जेवणाची माेफत व्यवस्था
औषधी घेण्यासाठी आलेल्या रूग्णांना सेवा देण्यास देसाईगंज येथील नागरिक व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. रांगेत लागलेल्या रूग्णांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली. स्वयंसेवक पाण्याची कॅन धरून रांगेत लागलेल्या रूग्णांपर्यंत पाेहाेचत हाेते. आराेग्य विभागाने रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तसेच डाॅक्टरांचे पथकही हाेते. सिंधू भवनात रूग्णांना माेफत जेवणाची व्यवस्था, गजानन महाराज मंदिरात झाेपण्याची व्यवस्था करण्यात आली. आरमाेरी, गडचिराेली, पुराडा, कुरखेडा येथून अतिरिक्त पाेलिसांची कुमक बाेलाविण्यात आली हाेती.
देशभरातील रूग्ण
दमा हा तसा असाध्य राेग समजल्या जाते. मात्र वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या औषधीने अनेकांना या राेगापासून कायमची मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे ही औषधी घेण्यासाठी रूग्णांची संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे ही औषधी वर्षातून एकदाच मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी दिली जाते. मागील ३९ वर्षांपासून ही औषधी याच दिवशी दिली जात आहे. छत्तीगड, तेलंगणा, मध्यप्रदेश राज्यासह महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यातून रूग्ण दाखल झाले आहेत.