गडचिरोलीत रेल्वे पोहोचणार
By Admin | Updated: May 13, 2014 23:33 IST2014-05-13T23:33:48+5:302014-05-13T23:33:48+5:30
बहुप्रतिक्षित वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रश्न अखेर सुटला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व्हेक्षण कार्य पूर्ण करून आता हा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द केला आहे.

गडचिरोलीत रेल्वे पोहोचणार
गडचिरोली : बहुप्रतिक्षित वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रश्न अखेर सुटला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व्हेक्षण कार्य पूर्ण करून आता हा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता केंद्रीय रेल्वे बोर्ड या कामाची निविदा काढून प्रत्यक्ष रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात करेल. वर्षअखेरपर्यंत वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम प्रारंभ होईल, अशी माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मारोतराव कोवासे यांनी दिली आहे. खासदार मारोतराव कोवासे यांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा केली. ५२.३६ किमी लांबीच्या वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी २७८.६५ हेक्टर जमीन लागणार आहे. या रेल्वे मार्गाकरीता ४६३.३ कोटी रूपयाचा खर्च येणार असून यातील २२९.0१ कोटी रूपयाचा वाटा राज्य सरकार उचलणार आहे. रेल्वे मार्गाच्या सिव्हील (बांधकाम विषयक) कामासाठी २२३.६३ कोटी, विद्युतीकरणाच्या कामासाठी १.८९ कोटी तर एस अँन्ड टी इंजिनिअरींग कामासाठी ३.४९ कोटी रूपयाचा खर्च येणार आहे. १३५0 मीटर लांबीचा वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग वैनगंगा नदीला समांतर राहणार असून या रेल्वे मार्गासाठी चुरमुरा व कोंढाळा या दोन गावातील ३२.२ हेक्टर खासगी जमीनही अधिग्रहीत केली जाणार आहे. या कामासाठी ५.२ कोटी रूपये दिले जाणार असल्याची माहिती खासदार कोवासे यांनी चर्चेदरम्यान दिली. या ५२.३६ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर २0 पूल, ९ रेल्वेस्टेशन राहणार आहे. यामध्ये वडसा, कोंढाळा, आरमोरी, डोंगरगाव, चुरमुरा, पोर्ला, साखरा, गोगाव, गडचिरोली यांचा समावेश आहे. वडसा रेल्वे स्थानकाचा विकासही करण्याची योजना यात आहे. या ठिकाणी जंक्शनस्तरावरील स्थानकाच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी ५0 टक्के निधी देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला २८ फेब्रुवारी २00२ व २२ ऑगस्ट २00२ ला पत्र दिले होते व तशी तयारीही दर्शविली होती. ३0 कोटी रूपयाचा निधी २0१४-१५ च्या रेल्वे अर्थ संकल्पात या मार्गासाठी उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. वडसा-गडचिरोली हा रेल्वे मार्ग मंजूर करून निविदा कामापर्यंतचा त्याचा पाठपुरावा करण्यात रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांचे मोठे सहकार्य मिळाले, असेही खासदार कोवासे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी या रेल्वे मार्गाचे भूमीपूजन करण्यासाठी सातत्याने रेल्वेमंत्री व आपण पाठपुरावा केला. परंतु महाराष्ट्र शासनाकडून याबाबत योग्य सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे या कामाचे भूमीपूजन राहून गेले, अशी खंत खासदार कोवासे यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’ने गेल्या अनेक वर्षांपासून वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या बाबतचा प्रश्न लावून धरला, असा उल्लेख खासदार कोवासे यांनी यावेळी व्यक्त केला. ‘लोकमत’ कार्यालयात खासदार कोवासे यांचे कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी इरशाद शेख आदींनी स्वागत केले. खासदार कोवासे यांनी राजकीय घटनाक्रम व जिल्ह्यातील समस्यांबाबतसुध्दा विस्तृत चर्चा केली. (जिल्हा प्रतिनिधी) यावेळी खासदार कोवासे यांच्या समावेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश अर्जुनवार हे ही उपस्थित होते.