मजुरांना रोजगार देण्यात गडचिरोली जिल्हा दुसरा
By Admin | Updated: March 21, 2017 00:43 IST2017-03-21T00:43:45+5:302017-03-21T00:43:45+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २९४ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात विविध कामे सुरू असून ...

मजुरांना रोजगार देण्यात गडचिरोली जिल्हा दुसरा
मजूर उपस्थितीत दुसरा क्रमांक : रोहयोची १ हजार ३१८ कामे सुरू
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २९४ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात विविध कामे सुरू असून या कामांवर आजघडीस ४६ हजार २७७ मजूर उपस्थिती आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास गडचिरोली जिल्ह्यात नरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली असून मजूर उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. मजूर उपस्थितीत पहिल्या क्रमांकावर गोंदिया असून तिसऱ्या क्रमांकावर भंडारा जिल्हा आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणास्तरावर विविध प्रकारची कामे मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, बोडी, मजगी, शेततळे, सिंचन विहीर, शौचालय, नाडेप, घरकूल, गुरांचा गोठा, वृक्ष लागवड, पिण्याच्या पाण्याची विहीर आदी कामांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण ४५६ ग्रामपंचायती आहेत. यापैकी २९४ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये रोहयोची एकूण १ हजार ३१८ कामे सुरू आहेत. नरेगा कायद्यान्वये प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याचे बंधनकारक आहे. या संदर्भात राज्य शासनाचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाला सक्त निर्देश आहेत. रोहयोंतर्गत अधिकाधिक कामे सुरू करून उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेंतर्गत रोहयो कामाचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करून त्यानुसार रोहयोची कामे केली जातात.
कुरखेडा तालुका आघाडीवर
रोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक कामे सुरू करून जास्तीतजास्त मजुरांना रोजगार देण्यात कुरखेडा तालुका आघाडीवर असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात सर्वाधिक १० हजार ७३६ मजुरांना सद्य:स्थितीत रोहयोतून रोजगार मिळाला आहे.
ग्रामसेवकांच्या संपाचाही परिणाम
गतवर्षी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या उन्हाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर मार्च महिन्यात जवळपास ६० हजार मजूर उपस्थिती होती. मात्र यावर्षी नेमक्या याच कालावधीत ग्रामसेवकांनी संप पुकारल्यामुळे रोहयो कामे प्रभावित झाली. परिणामी प्रभावी जनजागृतीअभावी गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातील रोहयो कामावरील मजूर उपस्थिती कमी आहे. ६० हजार वर मजूर उपस्थिती ठेवण्याचे जि.प. नरेगा विभागाचे नियोजन होते. मात्र गावपातळीवर सदर नियोजन काही प्रमाणात अयशस्वी झाले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांना रोजगार देण्यात महाराष्ट्रातील हिंगोली, जालना, रायगड, उस्मानाबाद, कोल्हापूर आदी जिल्हे यंदा प्रचंड माघारले असल्याचे दिसून येत आहे.