गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीने तीन घरं कोसळली; जिवीतहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:00 IST2019-08-23T13:59:17+5:302019-08-23T14:00:13+5:30
गडचिरोली जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील दोन घरे तर अहेरी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीने तीन घरं कोसळली; जिवीतहानी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील दोन घरे तर अहेरी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली आहे.
महागाव येथील शिवकुमार राजेश जनगम यांचे राहते घर शुक्रवारी ( दि. २३) पहाटे ४ वाजता कोसळले. घर कोसळत असतांना राजेश यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुले घरातच होती. घर कोसळले त्यावेळी सर्व जण आतमध्ये असल्याने त्यांना बाहेरही पडता आले नाही. मात्र नशीब बलवत्तर असल्याने एवढ्या मोठ्या अपघातातुन सर्व बचावले आहेत. मात्र त्यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आला आहे.
महागाव येथीलच महादेव गंगा वेलादी यांचा परिवार झोपेत असतांना मुसळधार पावसाने त्यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने ही भिंत बाहेरील बाजूस पडल्याने इथेही जीवितहानी झाली नाही. महागावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय अलोणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती महसूल विभागास दिली.
तिसरी घटना अहेरी येथील गडअहेरी परिसरात घडली असून गडअहेरी मुरूमखदान येथील हिमवंत सत्यनारायण पस्पुनूरवार यांचे घर ही मुसळधार पावसाने कोसळले. यात कोणतीच जीवितहानी झाली नाही. महसूल विभागाने मदत करावी अशी मागणी अतिवृष्टीग्रस्त नागरिकांनी केली आहे.