गडचिरोली शहराचा पाणी पुरवठा ठप्प
By Admin | Updated: September 6, 2016 00:50 IST2016-09-06T00:50:14+5:302016-09-06T00:50:14+5:30
स्थानिक नगर पालिकेच्या वतीने गडचिरोली नजीकच्या वैनगंगा नदीवर बसविण्यात आलेल्या नळ योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो.

गडचिरोली शहराचा पाणी पुरवठा ठप्प
गृहिणी त्रस्त : फिल्टर प्लॅन्टवरील दोन्ही मोटार जळाल्या
गडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या वतीने गडचिरोली नजीकच्या वैनगंगा नदीवर बसविण्यात आलेल्या नळ योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. बोरमाळा मार्गावर असलेल्या पालिकेच्या फिल्टर प्लॅन्टवरील नळ पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही विद्युत मोटारी जळाल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाण्यासाठी गृहिणींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गडचिरोली पालिकेच्या वतीने शहरातील सर्वच २३ वॉर्डात पाणी पुरवठा करण्यासाठी सात जलकुंभ तयार करण्यात आले आहे. याशिवाय बोरमाळा मार्गावर जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्याचे शुध्दीकरण झाल्यावर विद्युत मोटारच्या सहाय्याने शहरातील जलकुंभांमध्ये पाणी पुरवठा केला जातो. तिथून नळाद्वारे नागरिकांना पाणी दिले जाते. सदर फिल्टर प्लॅन्टवरील पाणी पुरवठा करणारी एक मोटार चार दिवसांपूर्वी जळाली. त्यामुळे एकाच विद्युत मोटारच्या सहाय्याने शहराच्या अर्ध्या भागाला पाणी पुरवठा सुरू होता. यात पुन्हा रविवारी दुसरी विद्युत मोटार जळाली. त्यामुळे शहराचा संपूर्ण पाणी पुरवठा बंद झाला.
या संदर्भात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी सोनटक्के यांना विचारणा केली असता, नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लॅन्टवरील दोन्ही विद्युत मोटार जळाल्या. एक मोटार पूर्वीच जळाली होती. दुसरी रविवारी जळाली. सदर मोटार दुरूस्तीसाठी नागपूरच्या तंत्रज्ञाकडे पाठविण्यात आली आहे. मंगळवारी दुरूस्ती होऊन विद्युत मोटार गडचिरोलीत पोहोचणार आहे. त्यानंतर मंगळवारच्या सायंकाळपासून गडचिरोली शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव
शहरातील नगर पालिकेची पाणी पुरवठा योजना मागील सहा महिन्यांपासून कुचकामी ठरलेली आहे. शहराला नियमितपणे पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याच्या कारणावरून शहरात दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र पावसाळ्यात नदी पात्रात मुबलक पाणी असताना सुध्दा शहरात अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. पालिका प्रशासनाने तत्काळ शहरातील अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अन्यथा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या सुषमा येवले यांनी दिला आहे.