गडचिरोली शहर पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:17 IST2019-08-14T00:15:21+5:302019-08-14T00:17:51+5:30
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले.

गडचिरोली शहर पाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी जमा झाले. त्यामुळे गडचिरोली शहरातील काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा सोमवारच्या रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. काही नाले व नद्यांवरील पुलांवर पाणी चढले होते. त्यामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. सखल भागात असलेल्या शेतांमध्ये पाणी साचले.
गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील कन्नमवार नगरात गुडघ्यापेक्षा अधिक पाणी जमा झाले होते. वाहत्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनींनी गर्दी केली होती. राधे बिल्डींग परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने पोलिसांनी एका बाजूने वाहतूक बंद केली होती. आरमोरी मार्गावरील वन विभागाच्या नाका परिसरात पाणी साचले होते. मूल मार्गावरील आयटीआय ते गोकुलनगर मार्गालगतच्या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. आयटीआयच्या समोर मुख्य महामार्गावर अधिक पाणी असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गाने वळती केली जात होती. दुपारी पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली.