गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या विस्ताराबाबतचा कार्यक्रम निधी अभावी रखडला असून राज्य सरकारने गडचिरोली येथे मंजूर केलेल्या एसटीच्या विभागीय कार्यालयाचाही गाशा सहा महिन्यापूर्वीच येथून गुंडाळण्यात आला आहे. २६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला होता. नव्या जिल्ह्यासोबतच येथे शासनाच्या अनेक विभागाची कार्यालये सुरू करण्यात आली होती. मात्र ३० वर्षाचा कालावधी लोटूनही राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय गडचिरोली येथे सुरू करण्यात आलेले नव्हते. २०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंडळ कार्यालय व एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालय गडचिरोली येथे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. वन व बांधकाम विभागाचे कार्यालय येथे सुरू झाले. एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाचे २६ जानेवारी २०१४ ला उद्घाटन करण्यात आले. विभागीय नियंत्रकही नियुक्त करण्यात आला होता. परंतु अवघ्या ८ ते १० दिवसातच या कार्यालयाचा गाशा गडचिरोलीतून गुंडाळण्यात आला व पुन्हा चंद्रपूर येथूनच कारभार सुरू करण्यात आला आहे. येथे विभागीय कार्यालयासाठी व आदिवासी चालक प्रशिक्षण गृहासाठी १२ एकर जागाही निश्चित करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली मुख्यालयातील बसस्थानकावर केवळ ५ फलाट आहे. आणखी ३ फलाट करण्याचेही काम हाती घेण्यात येणार होते. राज्याचे तत्कालीन परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी विधीमंडळात तसे आश्वासनही दिले होते. स्थानिक बसस्थानकावर ३ फलाटाच्या बांधकामासाठी जागाही मोकळी करण्यात आली आहे. परंतु संबंधीत कामासाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे कामही रखडलेले आहे. लोकप्रतिनिधीची या कामाप्रती असलेली उदासिनता यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. ३२ वर्षाच्या कालखंडानंतरही एसटीचे विभागीय कार्यालय येथे सुरू होऊ शकलेले नाही. याचे दु:ख गडचिरोली वासीयांनाही आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली बसस्थानकाचा विस्तार कार्यक्रमही रखडला
By admin | Updated: August 26, 2014 23:26 IST