गडचिरोलीकरांना न कळलेले ‘आबा’
By Admin | Updated: February 19, 2015 01:39 IST2015-02-19T01:39:15+5:302015-02-19T01:39:15+5:30
गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची धुरा स्वत:हून अंगावर घेणाऱ्या आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीचा लौकिक राज्याच्या कानाकोपऱ्यात वाढविला.

गडचिरोलीकरांना न कळलेले ‘आबा’
गडचिरोली : गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची धुरा स्वत:हून अंगावर घेणाऱ्या आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीचा लौकिक राज्याच्या कानाकोपऱ्यात वाढविला. याची प्रचिती त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून व्यक्त झालेल्या शोक संवेदनातून दिसून आली. मात्र आबांची असलेली सकारात्मक विकासाची संकल्पना या जिल्ह्यातल्या कोणत्याच लोकप्रतिनिधीला आत्मसात करता आली नाही. याची खंत अनेकांना आजही लागून आहे. आबांनी या जिल्ह्यासाठी आणलेल्या विकास निधीतही वाटपावरून वाद न्यायालयापर्यंत नेण्यात आले. यावरूनच आबांनी या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींची मानसिकता ओळखली हेही अनेकदा त्यांनी जाहीररित्या बोलून दाखविले होते.
एका वजनदार राजकीय नेतृत्त्वाने जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यामुळे गडचिरोलीच्या विकासाला एक सकारात्मक आयाम देण्याचा काम त्यांच्या माध्यमातून झाले. कधी नव्हे ते गडचिरोलीच्या विकास कामासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला. गावागावात विकास काम सुरू झाले पाहिजे म्हणून ग्रामपंचायतींना विकास कामे करण्याचे अधिकार दिले. जिल्हा परिषदेला जिल्हा विकास निधीतूनही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला. पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी जसे विकासाची संकल्पना राबवितात व आपल्या गावांचा विकास करतात, तसा गडचिरोलीच्या स्थानिक नेत्यांनी करावा, अशी आबांची कायम मनिषा होती. परंतु आबांची ही इच्छा शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. याची खंत आजही अनेकांना आहे.
जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीवरून वाद होऊन वाटपाचे प्रकरण न्यायालयात गेले. जी विकास कामे झाली, तिच्या दर्जाविषयी आबा नेहमी चिंतेच्या स्वरात जाहीररित्या बोलत. कंत्राटदारांच्या कामांचा दर्जा तपासा असे ते सातत्याने सांगत राहिले. पोर्ला आरोग्य केंद्राच्या उद्घाटनालाही त्यांनी हीच बाब प्रकर्षाने मांडली. गडचिरोलीकरांना आबा खऱ्या अर्थाने समजलेच नाही. ते अधिकाऱ्यांचेच ऐकतात, असा अनेकदा आक्षेपही त्यांच्यावर नोंदविण्यात आला. परंतु आबा नेहमी अढळ राहीले व गडचिरोलीच्या विकासाची चिंता त्यांनी कायम वाहिली. या जिल्ह्यातला दुर्गम भागातील विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी त्यांच्यामुळेच शिक्षणासाठी जाऊ शकला. या जिल्ह्यात अनेक नव्या देखण्या इमारती उभ्या करण्यात आबांचे फार मोठे योगदान आहे. हा जिल्हा आबांचे ऋण कधीही भरून काढू शकणार नाही, एवढे काम त्यांनी या जिल्ह्यात केले. (जिल्हा प्रतिनिधी)